म्हणून मी असा निर्णय घेतला – अजित पवार यांनी उलगडले गुपित

0
439

पुणे, दि. ६ (पीसीबी) – अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय का घेतला?, असा काही लोकांना प्रश्न पडतो. मात्र, शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेण्याचे धाडस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये आहे. तेच देशाला नेतृत्व देऊ शकतात, त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं की अशा नेत्याच्या पाठीशीच आपण उभं राहिलं पाहिजे. त्यातूनच महाराष्ट्राचा विकास साधला पाहिजे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते ‘सहकार से समृद्धी’ या पोर्टलचे उद्‌घाटन पिंपरी चिंचवड येथे आज करण्यात आला आहे. कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. त्यात अजित पवार बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मी एका कारखान्याचे नेतृत्व करतो. त्या कारखान्याची एफआरपी २८०० रुपये निघते. पण, त्या कारखान्याने ३३५० रुपये प्रतिटन उसाला भाव दिला आहे. एका टनाला ५०० रुपये एफआरपीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना मिळतात. त्याला प्राप्तीकर बसला असता. मात्र, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी एफआरपीपेक्षा जास्त भाव देणाऱ्या साखर कारखान्यांवरील कर माफ करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे राज्यातील साखर कारखान्याला प्राप्तीकर बसत नाही. त्याचा फायदा देश आणि राज्यातील शेतकऱ्यांचा झाला आहे. जे चांगलं आहे, ते चांगलं आहे.

आज पंतप्रधानांनी २५ हजार कोटी रुपये खर्चून ५०८ रेल्वे स्थानकांचे आधुनिकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्थानके आहेत. या अगोदर असे धाडस कोणी दाखवलं नाहीत. महाराष्ट्रात सध्या केंद्र सरकारकडून ८० हजार कोटींची कामे सुरू आहेत. अशी कामे करण्याचे धाडस केवळ नरेंद्र मोदीच करू शकतात, त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं की अशा नेत्याच्या पाठीशीच आपण उभं राहिलं पाहिजे, असे अजित पवार यांनी सांगितले.

अजितदादा म्हणाले की, ज्या पंतप्रधानांनी गेल्या नऊ वर्षात एकही सुटी घेतली नाही. अशा प्रकारचे काम फक्त मोदीच करू शकतात. आज देशाला मोदींशिवाय पर्याय नाही. तेवढ्याच तडफेने अमित शहा हेही काम करतात. एखादं काम सांगितल्यानंतर ते तातडीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. आजही मी, मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक तास चर्चा केली. पुणे मेट्रो आणि पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेबाबतही चर्चा केली. त्यांनी या हायस्पीड रेल्वेमार्गाचा प्रस्ताव पाठविण्यास सांगितले आहे.