‘…म्हणून जे बोलायचं आहे ते खाजगीत बोला चव्हाट्यावर नाही’; ‘त्या’ वक्तव्यावरून शिवसेनेने घेतला पटोलेंचा समाचार

0
208

मुंबई, दि.१३ (पीसीबी) : नाना पटोलेंनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात कुजबुज सुरु आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्येच यावरून चर्चा सुरु झाल्यात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप केला. त्यांच्या या आरोपांमुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण झाला. पटोले यांनी केलेल्या विधानाचे राजकारणात पडसाद उमटले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावर संताप व्यक्त केलाच पण नंतर शिवसेनेनंही नाना पटोले यांना चांगलंच सुनावलं.

शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत म्हणाले कि, “नाना पटोले हे एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते विधानसभा अध्यक्ष राहिले आहेत त्यामुळे आपण काय बोलतोय याचं भान ठेवलं पाहिजे. नाना पटोले यांना जे काही बोलायचं आहे ते त्यांनी खाजगीत बोलावं चव्हाट्यावर बोलू नये”, असा सल्ला त्यांनी पटोले यांना यावेळी दिला.

पुढे सावंत असंही म्हणाले कि, “तुम्हाला काही अडचण आहे, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना किंवा बाळासाहेब थोरात यांना सांगा; पण असं वक्तव्य करणं योग्य नाही. अशा लोकांमुळे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा खराब होणार नाही, याचा विचार केला पाहिजे. त्यांना कसं थांबवायचं हे आता त्याचा पक्ष आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील”.

दरम्यान नाना पटोलेंच्या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त करत त्यांच्यावर ताशेरे ओढले. अजित पवार म्हणाले कि, “नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीला एकप्रकारे सुरुंग लावला जातोय. नाना पटोले हे नेते किंवा मंत्री नाहीत, ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका मानली जाते. त्यामुळे नाना पटोले यांची भूमिका महाविकास आघाडीला कमकुवत करणारी तसेच अडचणीत आणणारी आहे,” अशा शब्दात अजित पवार यांनी भूमिका मांडली.