…म्हणूनच पवार काका-पुतणे भावतात

0
849
थर्ड आय – अविनाश चिलेकर 
उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी (१८ सप्टेंबर) भल्या पहाटे सह वाजता फुगेवाडीत अवतरले. कारण होते मेट्रोची पहाणी. अधिकारी कर्मचाऱ्यांचा ताफा आणि मोजके पोलिस होते. मेट्रो स्टेशनचे बांधकाम, मेट्रोचा मार्ग कुठपर्यंत आला, आणखी किती कालावधी लागेल याची विचारपूस त्यांनी केली. पहिले तिकीट काढून फुगेवाडी ते संत तुकारामनगर असा प्रवास करून पाहिला. दादा पवार अर्धा-पाऊण तास मेट्रो स्टेशनवर  होते. या कानाची खबर त्या कानाला नव्हती. शहरातील तमाम पुढारी, नेते, नगरसेवक साखर झोपेत होते. आवराआवर करुन ते येईपर्यंत दादा निघून गेले होते. खरे तर, अन्य नेत्यांप्रमाणे आरामात दहा-अकरा वाजता (कार्यालयीन वेळेत) त्यांना भेट देता आली असती. मीडियाला बोलावून बोभाटा करता आला असता. त्यांनी तसे काहीही केले नाही, भल्या पहाटे भेट दिली. हे उचकटून सांगायचा हेतू, पवार मंडळींची कामाची पध्दत. (…दादांचा शपथविधीसुध्दा पहाटेचाच)
अगदी महिन्यापूर्वी असेच दुपारची वेळ होती. महापालिका भवनात मेन गेटसमोर अचानक एक भली मोठी गाडी थांबली आणि त्यातून चक्क शरद पवार उतरले. सर्वांची जाम पळापळ झाली. कोरोना नियंत्रमासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने उभी केलेली सारथी यंत्रणा आदर्श असल्याने ती नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी खुद्द पवार काका आले होते. पाऊन तास खुर्चीत बसून महापालिका आयुक्तांकडून त्यांनी सारथी समजून घेतली. वयाच्या ८० व्या वर्षी घरात आराम करायचे सोडून पायाला भिंगरी लावल्यासारखे हे आजोबा राज्यभर फिरतात. बाहेर पावला पावलावर कोरोनाचे भूत ठाण मांडून बसले आहे… तुमच्या वयाला ते धोकादायक आहे… असे तमाम मंडळींनी सांगूनही गरज नसतानाही पवार साहेब रात्रंदिवस फिरतात. लोकांमध्ये त्यांना एनर्जी मिळते. खरे तर, या महापालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता गेली आणि भाजपची आली. या राजकीय परिस्थितीचा त्यांनी बाऊ केला नाही, हे त्यांचे मोठेपण. त्यांच्या शागीर्दामध्ये तो गूण नाही हे दुर्दैव. म्हणूनच पवार काका-पुतणे लोकांना अजूनही आजही भावतात. भाजपच्या उधार नेत्यांचे शहरावरचे प्रेम हे अत्यंत बेगडी (पुतणामावशीचे) वाटते. त्यामुळेच २०२२ मध्ये उद्या पुन्हा पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीमय झोल्यास वाईट वाटू नये. पवारांच्या येरझाऱ्या फुकटच्या नाहीत.
निधीला संमती, जंबो कोव्हिड सेंटरची उभारणी – 
कोरोनीच्या संकट काळात अजित पवार यांचे पिंपरी चिंचवड शहराकडे बारीक लक्ष होते व आहे. महापालिका प्रशासन काय करते याची बारीकसारीक माहिती ते रोज घेत. कोरोना मध्ये उपलब्ध निधीच्या ३३ टक्के खर्च करण्याची परवनगी असताना त्यांनी अर्थमंत्री या नात्याने खास बाब म्हणून १०० टक्के निधी खर्च करायला परवानगी दिली. शहराची पत त्यांना माहित असल्याने चुटकीसरशी निर्णय घेतला. कोरोनाच्या संकट काळात जंबो कोव्हिड सेंटरची उभारणी, त्यासाठी कुठेही कमी पडू नये याची खबरदारी घेत जातीने अजित पवार लक्ष देतात. महापालिकेत भाजपची सत्ता असताना इतका लळा जिव्हाळा असण्याचे कारण पिंपरी चिंचवडवरचे प्रेम. मावळ लोकसभेला चिरंजीव पार्थ पवार याचा पराभव दादांच्या जिव्हारी लागला होता. तेव्हापासून त्यांची नाराजी कायम होती. आता ती भळभळून वाहणारी जखम भरली आहे. पार्थ पवार या महापालिकेत येऊन आयुक्तांना भेटून विकास कामांची चर्चा करतात. ताकाला जाऊन भांड लपवायचे कारण नाही. कारण हे सगळे सुरू आहे, त्यामागे काही समिकरणे आहेत. वेळ आल्यावर पत्ते खुले होतील. दादांची ही साखर पेरणी सुरू आहे. दुसरीकडे भाजपाचे स्थानिक नेते (पूर्वाश्रमिचे दादांचे सहकारी) मौन बाळगून आहेत. हे सगळेच खूपच बोलके आहे.
पवना जलवाहिनीचा विषय सोडवा –
पिंपरी चिंचवड शहर आणि मावळ तालुक्यासाठी अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे पवना जलवाहिनी. दहा वर्षांपूर्वी केवळ अजित पवार यांच्या अरेरावीमुळे पवना जलवाहिनीचा प्रश्न चिघळला आणि काम बंद पडले. तीन निष्पाप शेतकऱ्यांचा हकनाक बळी गेला. राहुल गांधींनी भेट दिली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रकल्पाला स्थगिती दिली. भाजप आणि शिवसेनेच्या तत्कालीन नेत्यांनी त्या संधीचा पूरेपूर राजकीय फायदा घेतला. राष्ट्रवादीला त्यात बदनाम केले आणि धु धू धुतले. खरे तर निव्वळ राजकारण झाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, महापालिकेत भाजपची सत्ता आली पण त्यांनाही प्रश्न निकाली करता आलेला नाही. न्यायालय, पाटबंधारे विभाग, लवाद अशा सर्वांनी हिरवा कंदिल दिला. राजकीय सहमती होत नसल्याने काम अर्धवट स्थितीत बंद आहे. १०० कोटींचे पाईप सडून गेले. ३०० कोटींच्या कामाची किंमत आता जवळपास दुप्पट म्हणजे ६०० कोटींवर गेली आहे. आता पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेनेचे खासदार संजय राऊत त्यात लक्ष घालत आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत एक बैठक निमंत्रीत करण्याचे घाटते आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे शिवसेनेचे, मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके राष्ट्रवादीचे. आता बॉल महाआघाडीच्या कोर्टात आहे. प्रकल्पग्रस्तांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्यात, त्यामुळे प्रश्न सोडविण्यासाठी हा चांगला काळ आहे. शिकार टप्प्यात आहे, आता दादा बार टाकणार की पुन्हा दादांचीच शिकार होणार ते पाहू या…