मोशीत गॅस सिलेंडर दुरुस्ती करणाऱ्याच्या निषकाळजीपणामुळे स्फोट; महिला गंभीर भाजली

0
745

मोशी, दि. २२ (पीसीबी) – गॅस सिलेंडर लिक होत असल्याची तक्रार केल्यानंतर गॅस एजन्सीचा दुरुस्ती करणारा व्यक्ती घरी आला. त्याने सर्वीसिंग न करुन काम व्यवस्थीत झाल्याची हमी दिली. मात्र गॅस सिलेंडर चालू करताच स्फोट झाला. या घटनेत एक महिला गंभीररित्या भाजली. ही घटना आळंदीरोड मोशी येथे सस्ते बिल्डींगमध्ये घडली.

रंजना असे गंभीर भाजुन जखमी झालेल्या माहिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा भाऊ सुरेश हिंगणे (वय ५२, रा . नागेश्वर मंदिराजवळ, मोशी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, वैष्णवी या गॅस एजन्सीचा सर्वीस करणारा नितीन नागरगोजे (वय २८, रा. आळंदी) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजना या एकट्या मोशी येथे राहतात. शनिवारी (दि.१६ फेब्रुवारी) त्यांच्या घरातील गॅस सिलेंडरच्या रेगुलेटरमधून गॅस लिक होत असल्याचे त्यांना कळाले. त्यांनी तातडीने याची तक्रार त्यांचा एजन्सी धारक वैष्णवी गॅस एजन्सी यांचेकडे केली. एजनसीने तातडीने रंजना यांच्या घरी गॅस दुरुस्त करणारा नितीन याला दुरुस्तीसाठी पाठवले. नितीनने दुरुस्ती न करता गॅस वापरण्यास रंजना यांना सांगितले. त्यावर विश्वास ठेवून रंजना यांनी गॅस चालु केला असता गॅसचा स्फोट झाला. यामध्ये रंजना या गंभीर भाजल्या आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर नितीन याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.