मोरया गोसावी मंदिर परिसरात उद्या संचारबंदी – आदेशाचा भंग करणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई

0
285

पिंपरी,दि. 1 (पीसीबी): अंगारकी चतुर्थीनिमित्त गणेशभक्‍त मोरया गोसावी मंदिर परिसरात गर्दी करण्याची शक्‍यता असते. कोरोनचा वाढता प्रसार लक्षात घेऊन चिंचवडगावातील श्री मोरया गोसावी मंदिर परिसरात संचारबंदी ठेवण्यात आली आहे. सध्या करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, या परिसरात मंगळवारी (दि. 2) जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

संकष्टी चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थीला श्री मोरया गोसावी यांच्या दर्शनाकरिता सुमारे 80 ते 90 हजार भाविक येत असतात. सध्या करोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याने चतुर्थी निमित्ताने होणारी गर्दी टाळण्यासाठी या परिसरातील जमावबंदी आणि संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.
या काळात मंदिर आणि आसपासच्या परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिले आहेत. तसेच या आदेशाचा भंग करणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या संचार बंदीतून अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे.