मोदी सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी योजना?; बियाणे, खत, कीटकनाशके, मजुरीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

0
1387

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणार आहे. तेलंगण सरकारने तेथील शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या योजनेच्या धर्तीवरच केंद्र सरकार देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक योजना सुरू करणार आहे. या योजनेअंतर्गत थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार असून या योजनेसंदर्भात सरकार दरबारी हालचाली सुरू आहेत. विशेषत: अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे, खत, कीटकनाशके आणि मजुरी यासाठी ठराविक रक्कम सरकारकडून मिळणार आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात पेरणीपूर्वी एकरी चार हजारांचे थेट आर्थिक साहाय्य करण्याची ‘रयतु बंधू योजना’ धडाक्यात राबवली. या योजनेचे कृषी क्षेत्रात कौतुक करण्यात आले होते. याच धर्तीवर आता केंद्र सरकारनेही देशभरातील शेतकऱ्यांसाठी योजना राबवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार योजनेसाठी सुमारे १.२५ लाख कोटी रूपये लागणार असून केंद्र सरकार राज्यांच्या मदतीने ही योजना राबवणार आहे. या योजनेत ७० टक्के वाटा केंद्राचा असेल तर ३० टक्के वाटा राज्य सरकारांचा असेल.

या योजनेवर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. मात्र, या योजनेसाठी सरकार दरबारी बैठकांचे सत्र सुरु असल्याचेही सूत्रांनी म्हटले आहे. याशिवाय केंद्र सरकार विविध प्रस्तावांचा विचार करत आहे. निती आयोगाने केंद्र सरकारला शेतकऱ्यांसंदर्भात काही शिफारशी केल्या होत्या. यात पिकाला किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी भाव मिळाल्यास शेतकऱ्याला अनुदान देण्याची शिफारस करण्यात आली होती. यासंदर्भातही केंद्र सरकार विचार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. निती आयोगाच्या प्रस्तावानुसार शेतकऱ्यांना या योजनेसाठी जवळील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतीची जागा, पिक याची नोंदणी करावी लागेल. यानंतरच त्याला याचा लाभ मिळणार आहे.