मोदी सरकारचा जनतेला मोठा झटका, सलग दुसऱ्यांदा गॅस दरवाढ

0
430

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) : आधीच महागाईने होरपळत असलेल्या सर्वसामान्यांना मोदी सरकारने पुन्हा दणका दिला आहे. मे महिन्यात दुसऱ्यांदा घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. बारा दिवसांपूर्वी 50 रुपयांची दरवाढ करण्यात आली होती. तर गुरूवारी हे दर पुन्हा 3 रुपये 50 पैशांनी वाढवण्यात आले. तर व्यावसायिक सिलेंडरच्या दरात आठ रुपयांनी वाढ झाली आहे.

मागील काही महिन्यांपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. यापूर्वी एक मे रोजी व्यावसायिक वापराच्या 19 किलो एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल 102.50 रुपयांची वाढ झाली होती. गुरूवारी पुन्हा आठ रुपयांनी हा सिलेंडर महागला. त्यामुळे हा सिलेंडर आता 2 हजार 363 रुपयांना मिळणार आहे. तर सात मे रोजी 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरचे दर 50 रुपयांनी वाढवले होते.

काही दिवसांपूर्वी देशातील अनेक शहरांतील घरगुती गॅस सिलेंडरच्या दराने हजारचा टप्पा ओलांडला आहे. आता त्यामध्ये गुरूवारी आणखी भर पडली आहे. गुरूवारी 3 रुपये 50 पैशांनी भाववाढ झाल्याने राजधानी दिल्लीसह मुंबईतील दर 1हजार 3 रुपयांवर पोहचले आहेत. तर कोलकाता शहरातील दर 1 हजार 29 आणि चेन्नईतील दर 1018.50 रुपयांवर गेले आहेत.