मोदी राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर मीदेखील राजकारण सोडेन – स्मृती इराणी

0
678

पुणे, दि. ४ (पीसीबी) – राजकारणात आल्यानंतर माझ्यावर विश्वास ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  मला संधी दिली होती. त्यामुळे जेव्हा नरेंद्र मोदी सक्रीय राजकारणामधून निवृत्त होतील, तेव्हा मी देखील राजकारण सोडेन,  असे  केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी  म्हटले आहे.

सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल जे. डब्लू मॅरिएट येथील ‘वर्डस् काउंट’ या शब्दोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी ‘स्क्रिप्टिंग हर स्टोरी – फ्रॉम स्टार टू स्टार कॅम्पेनर’ या विषयावर अद्वैता कला यांनी स्मृती इराणी यांची मुलाखत घेतली.

यावेळी त्या बोलताना म्हणाल्या की, एक राजकीय पक्ष म्हणून आम्हाला राजकारण करावेच लागते. मात्र विकासाचा मुद्दा हा आमच्या सरकारसाठी नक्कीच महत्त्वाचा आहे. नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोण? या प्रश्नावर  तो ठरविण्याचा अधिकार हा जनतेला आहे, असे उत्तर स्मृती इराणी यांनी दिले.

स्मृती इराणी पुढे म्हणाल्या की, २०१४ मध्ये ‘कोण स्मृती इराणी?’ असा प्रश्न अनेकांकडून केला जात होता. मात्र आता २०१९ मध्ये सगळ्यांना ‘स्मृती इराणी कोण आहेत’ हे माहिती आहे. परंतु मी अमेठीतून निवडणूक लढविणार की नाही याचा निर्णय पक्षाध्यक्ष अमित शहा घेतील, असेही त्यांनी  यावेळी स्पष्ट केले.