मोदी बोलले, पण शहरातील घराणेशाहिचे राजकारण संपणार का ? थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
659

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले`, असे तुकोबांचे वचन आहे. आजच्या राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यातलेच एक असल्याने जनता त्यांच्यामागे ठामपणे उभी आहे. १५ ऑगस्ट ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्राच्या अमृत महोत्सवानिमित्त केलेले भाषण म्हणूनच खूप आश्वासक वाटले. ७५ वर्षांतील बुरसटलेल्या राजकीय व्यवस्थेला बाजुला सारून आगामी काळात नवीन देण्याचा त्यांचा संकल्प आहे. भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या यंत्रणेवर त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली तशीच राजकारणातील घराणेशाहीवर ते अत्यंत पोटतिडकीने बोलले. या दोन्ही मुद्यांचा परामर्श त्यांनी घेतला. भले त्यात भाजपाचा स्वार्थ असेल, पण लोकांच्या मनातलेच ते बोलले. भ्रष्टाचार या विषयावर मोदींनी आठ वर्षांत काय केले आणि करत आहेत हा स्वतंत्र विषय आहे. घराणेशाहीवर गल्ली ते दिल्ली सर्वच राजकिय पक्षांनी थोडे अधिक मानावर घेऊन काम केले पाहिजे. भाजपाला त्यातले मर्म समजले म्हणून मोदींनी त्यावर भर दिला. आता त्यावर सर्व थरात मंथन झाले पाहिजे.

राजेशाही संपली, राजेही संपले पण, आजही भारतीय प्रजा त्या माणसिक गुलामगिरीतून बाहेर आलेली नाही. पूर्वीचे संस्थानिक, सावकार, जमीनदार, पाटील, धनदांडगे, बाहुबली हेच आजचे नवे राजे बनलेत. या मंडळींनी लोकशाहीला आपली बटीक बनवली आहे. राजाचा मुलगा राजा तसेच आता आमदार-खासदाराचा मुलगाच पुढचा आमदार-खासदार होतो हे समिकरण तुटले पाहिजे. चार-पाच पिढ्या एकाच घरात सत्ता नांदते, हे भूषण नाही तर लोकशाहितले प्रदूषण आहे. चहावाल्याचा मुलगा असलेले मोदी देशाचे पंतप्रधान झाले आणि इकडे रिक्षावाले एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मोदींनी त्यांच्या चार पैकी एकाही भावाला किंवा बहिणीला राजकारणात आणले नाही. शिंदेंनी मुलाला खासदार केले. पवार, ठाकरे यांच्या कुटुंबात तीन-चार पिढ्या मंत्री, आमदार, खासदार सगळे घरातच आहे. अनेक गावांतून गावचा सरपंच तीन-चार पिढ्या होऊनही गावची सत्ता हातातून सोडत नाही. हे थांबले पाहिजे, असा मोदी यांच्या भाषणाचा सांगावा आहे.

भाजपासाठी आता सुवर्ण संधी –
राज्यात आता आगामी महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका, ग्रामपंचायतच्या निवडणुका आहेत. भाजपा त्यातल्या किती घेणार ते पहायचे. बोलाचा भात बोलाची कढी ठरू नये ही अपेक्षा. मोदींच्या त्या विचारांचे आचरण पिंपरी चिंचवड शहर भाजपाने करायचे ठरवले तर काय होईल याचा थोडा लेखाजोखा आपण मांडू. उद्योगनगरी म्हणून नावारुपाला आलेले हे सुखी, संपन्न शहर तसे आता ५० वर्षांचे झाले, पण इथले राजकारण आजही गावकी-भावकीतच गुरफटलेले आहे. २०१७ मध्ये इथे भाजपाची सत्ता आली तीसुध्दा केवळ गावकी भावकीमुळेच, हे नाकारून चालणार नाही. पूर्वी शरद पवार, अजित पवार यांनी जे सूत्र वापरून इथे सत्तेचे राजकारण केले तेच केवळ सत्तेसाठी भाजपाने केले. ३० लाखाच्या या शहरात अवघे तीन लाख भूमिपुत्र असतील. २७ लाख लोक बाहेरुन इथे स्थिरस्थावर झाले, त्या जनतेचे प्रतिनिधीत्व करणारे अवघे २० – २५ टक्के नगरसेवक असतात. दुसरीकडे गावकीचे ७०-८० टक्के नगरसेवक असतात. पिढ्यानपिढ्या एकाच घरात नगरसेवक कायम आहेत. हीच मक्तेदारी, घराणेशाही मोडीत काढायचा विचार मोदींनी बोलून दाखवला. आजोबा, मुलगा, नातू असा तीन-तीन पिढ्यांचा हा कारभार आता बदला, असे मोदी सांगतात. शहरात दोन हजार डॉक्टर, किमान २५ हजारावर अभियंते, तितकेच प्राध्यापक, हजारो वकील, सीए, वास्तुविशारद, उद्योजक, व्यापारी आहेत. अनेक साहित्यिक, कलाकार, शास्त्रज्ञ, निवृत्त सनदी अधिकारी इथे आयुष्य घडविण्यासाठी आलेत. पण बुरसटलेल्या विचारसरणीमुळे या शहराच्या राजकारणापासून आजही ते खूप दूर आहेत. हे टॅलेंन्ट शहरराच्या निर्णय प्रक्रीयेत आले पाहिजे. मोदींच्या विचारांचा खरा मतीतार्थ तो आहे. समाजातील गुंड, गुन्हेगार, खंडणीखोर, चोर, दरोडेखोर, दारू-मटकावाले, भू माफिया यांना राष्ट्रवादीत प्राधान्य होते, आता भाजपामध्येही त्यांनाच मानाचे पान आहे. शहरात रा.स्व.संघ अत्यंत प्रभावी आहे, त्यांनी मनावर घेतले तर हा बदल सहज होऊ शकतो. राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांनी बदलत्या काळीची पावले ओळखून पक्ष कार्यकर्त्यांच्या एका मेळाव्यात याच विषयावर भाष्य केले होते. आता भाजपा मोदींच्या विचारांचा मान राखणार की माती करणार ते पहायचे.

घराणेशाहीचे ग्रहण आता संपवा –
मुंबई, पुणे, नागपूर या शहरांचे राजकारण त्या अर्थाने खूप झपाट्याने बदलले. अर्थात ती शहरे जुनी आहेत आणि त्यांना एक इतिहास आहे, वैचारीक बैठक, त्यांची जडणघडण तशी आहे. पिंपरी चिंचवडला जगातले नाही पण किमान देशातील नंबर एकचे शहर व्हायचे असेल तर हा नवा विचार अंगीकारला पाहिजे. जग खूप वेगाने बदलतेय, पण इथे गावचावडी अजूनही सुटत नाही. आता घराणेशाहीला मूठमाती दिली पाहिजे. निसर्गाचा एक नियम आहे, तुम्ही स्वतःहून बदला किंवा निसर्गच तुम्हाला बदलेल. या शहरात काटे, कुटे, काळभोर, दातीर, लांडे, लांडगे, बारणे, जगताप, फुगे, गव्हाणे, गावडे, ढोरे, गायकवाड, चिंचवडे, तापकीर, नढे, कोकणे, भोईर, भोंडवे, वाल्हेकर, कलाटे, कस्पटे, भालेकर, साने, आल्हाट, कुदळे यांची घराणेशाही आहे. अगदी नावासह काही दाखले द्यायचेच तर राष्ट्रवादीत विठोबा लांडे, विलास लांडे, मोहिनी लांडे, विश्वनाथ लांडे, विक्रांत लांडे आणि आता नव्याने येऊ घातलेले विराज लांडे असे एकाच घरात तीन पिढ्यांत नगरसेवकपद, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार होती. शिवसेनेत दिवंगत माजी खासदार गजानन बाबर यांच्या घरात दुसरे दिवंगत धाकटे बंधू मधुकर बाबर यांच्या नंतर प्रकाश बाबर आणि त्यांच्या पत्नी शारदा बाबर अगदी नगरसेवक, आमदार, खासदार सगळे एकाच घरात होते. आता त्यांची पुढची पिढी म्हणते बाबर नावाचा ब्रँन्ड आम्ही चालवणार. भाजपामध्ये आमदार लक्ष्मण जगताप नगरसेवक, आमदार, खासदार असे करत तीस वर्षे सत्तेत आहेत. त्यांचे धाकटे भाऊ शंकर नगरसेवक होते आता तेच आमदारकी खासदारकीचे स्वप्न पाहतात. भाजपाचे दुसरे आमदार आणि पक्षाचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी स्वसामर्थ्यावर २० वर्षे राजकारण केले, आता त्यांना धाकटे भाऊ सचिनभैय्या यांना कोणत्याही परिस्थितीत नगरसेवक करायचे आहे. वानगीदाखल हे प्रत्येक पक्षाचे दाखले दिलेत. महिला आरक्षण पडले पण आजही किमान ३०-४० टक्के नगरसेवकांना स्वतःच्या पत्नीसाठीच उमेदवारी पाहिजे असते. सत्ता आपल्याच घरात ठेवण्यासाठी हा आटापिटा असतो. त्यासाठी पाच-दहा कोटी खर्च करायची तयारी असते. अशा परिस्थितीत घराणेशाही कशी संपणार हा प्रश्न आहे. किमान यापुढे नगरसेवक होऊन गेलेल्यांच्या घरातच पुन्हा उमेदवारी न देता सर्वसामान्य, निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे. भाजपा ते कऱणार का याकडे लक्ष आहे.

नगरसेवकाला महिन्याचे मानधन अवघे १५ हजार आणि मिटींग भत्ता किमान ४०० रुपये असतो. पाच वर्षांत ती रक्कम नऊ लाख रुपये होतात. प्रत्यक्षात आजवरचा इतिहास सांगतो की, एका पंचवार्षीकमध्ये काही नगरसेवक हे किमान ५-६ कोटींचे मालक होतात. हे सगळे अर्थकारण विचारात घेतले पाहिजे. स्वच्छ चारित्राचे, अभ्यासू, निस्वार्थी, निःपक्ष, सर्वसमावेशक नगरसेवक पाहिजेत. भाजपाकडून तीच अपेक्षा आहे. घराणेशाही आणि भ्रष्टाचाराची बजबजपुरी संपवायची तर मोदींच्या भाषणातील विचार प्रत्यक्षात आणा.