मोदींनी उल्लेख केलेल्या तिहार जेलमधील व्यक्तीचा राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यांशी संबंध ?    

0
458

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची झोप उडवणारी व्यक्ती तिहार जेलमध्ये आहे, असे विधान  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोंदियाच्या सभेत केले होते. त्या व्यक्तीचे नांव समोर आले आहे. त्या  व्यक्तीचे नाव दीपक तलवार असे आहे. कुप्रसिद्ध लॉबिस्ट असलेल्या दीपकचे काही दिवसांपूर्वीच दुबईतून प्रत्यार्पण  करण्यात आले आहे.

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि दीपकची चांगली  मैत्री असल्याचे बोलले जात आहे. ‘एअर एशिया’ला सरकारी धोरणात स्वतःच्या फायद्यासाठी बदल करण्यास मदत केल्याचा आरोप तलवार याच्यावर ठेवण्यात आला आहे. १ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न लपवल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. तलवारने घडवून आणलेले करार प्रफुल्ल पटेल  मंत्री असताना झाले आहेत.  त्यामुळेच मोदींनी गोंदियाच्या सभेत या प्रकरणाचा उल्लेख केला.

मोदी आपल्या भाषणात  म्हणाले होते की, राष्ट्रवादीच्या नेत्यांना  आजकाल  झोप येत नाही. कारण  त्यांची झोप दिल्लीमधील तिहार तुरूंगामध्ये अडकली आहे. मी याबाबत अधिक बोलणार नाही. पण जो आत गेला आहे, तो काही बोलला, तर काय होईल? याची चिंता राष्ट्रवादीला वाटू लागली  आहे.  सर्व सत्य समोर येईल, तो दिवस लांब नाही, असे सूचक  विधान मोदींनी  केले.