मोकळ्या जागी नमाजवर बंदी आणता; मग संघाच्या शाखांवरही का नाही? काँग्रेस खासदाराचा सवाल

0
590

लखनऊ, दि. २८ (पीसीबी) – उत्तर प्रदेशातील नोएडात बागेमध्ये नमाज अदा करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. यावर काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे खासदार संपूर्णानंद यांनी टीका केली असून खुल्या जागेवर नमाजवर बंदी आणता तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) शाखांवरही बंदी आणण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच यासाठी दोन वेगवेगळे नियम का लावले जात आहेत, असा सवालही त्यांनी केला आहे.

खासदार संपूर्णानंद म्हणतात, जर खुल्या मैदानात नमाज अदा करण्यास बंदी आणण्यात आली आहे तर हा नियम संघाच्या शाखांवरही का लागू केला जात नाही. अशा प्रकारचे आदेश काढणे ही अनावश्यक बाब आहे. संपूर्णानंद हे उत्तर प्रदेश काँग्रेसच्या विचार विभागाचे प्रमुख आहेत.

२५ डिसेंबर रोजी नोएडाच्या सेक्टर ५८ मध्ये स्थानिक लोकांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी येथील बागेत नमाज अदा करण्यास बंदी घातली. तशा सुचना स्थानिक पोलिसांनी परिसरातील कंपन्यांना दिल्या. यामध्ये त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना या बागेत नमाजसाठी जाऊ नये असे निर्देश द्यावेत अन्यथा संबंधीत कंपनीवरच कारवाईचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

आज शुक्रवार असल्याने आजच्या दिवशी मुस्लिम समुदाय साप्ताहिक नमाज अदा करतात. त्यामुळे येथील बागेत नमाजसाठी मुस्लिमांनी एकत्र येऊ नये यासाठी प्रशासनाने बागेत सकाळीच पाणी मारुन ठेवले होते. कारण कोणी जमीनीवर नमाज पढू नये. इतकेच नव्हे या बागेच्या भोवताली मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.