मेधा पाटकर यांचे कामगारांना आवाहन गावाला पायी जाऊ नका

0
294

पिंपरी, दि. २० (पीसीबी) : पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्य़ातील स्थलांतरित कामगारांनी गावी परत जात असताना पायी चालत जाऊ नये. गावी जाण्यासाठी रेल्वे किंवा बसचा वापर करावा, असे आवाहन नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी पिंपरी येथे केले. कष्टकरी कामगारांच्या सुरक्षेसाठी पाटकर यांनी पिंपरीत रस्त्याने जाणाऱ्या स्थलांतरित नागरिकांची विचारपूस केली. आकुर्डी, चिंचवड, काळेवाडी, अजंठानग भागात त्यांनी भेट दिली. अजंठानगर भागात झोपडपट्टीत जाऊन त्यांनी घरकाम करणाऱ्या महिलांची विचारपूस केली. आकुर्डी शाळेतील आडिसा कामगारांनाही त्यांनी दिलासा दिला.

मेधा पाटकर यांनी आकुर्डी परिसरातून गावी चाललेल्या स्थलांतरित कामगारांबरोबर संवाद साधून त्यांच्याशी चर्चा केली. या वेळी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, इब्राहीम खान, महिला विभागाच्या माधुरी जलमूलवार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे शहर आणि जिल्ह्य़ाच्या परिसरामध्ये विविध ठिकाणाहून अनेक स्थलांतरित कामगार उत्तरेकडील आपल्या गावाकडे पायी जात असल्याचे दिसत होते. त्या कामगारांबरोबर संवाद साधून कार्यकर्त्यांकडून संबंधित पोलीस ठाणे तसेच प्रशासनाशी संपर्क साधून कामगारांना इच्छित स्थळी पाठविण्यात आले. कामगारांना सुखरूप त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी सरकारने व्यवस्था करावी, अशी अपेक्षा मेधा पाटकर यांनी व्यक्त केली.