मेट्रोतून प्रवासाला मोठी पसंती, आठवड्यात तीन लाखावर प्रवाशी

0
200

पुणे, दि. ८ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट रोजी पुणे शहरात होते. या दिवशी त्यांनी पुणे मेट्रोच्या दोन मार्गाचे उद्घाटन केले. त्यानंतर सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रूबी हॉल हे पुणे मेट्रोचे दोन मार्ग पुणेकरांसाठी सुरु झाले. गेल्या आठवडाभर पुणे मेट्रोतून प्रवास करणारे किती प्रवासी आहेत? याची आकडेवारी समोर आली आहे. तसेच शनिवार अन् रविवारी सुटी असून मेट्रोमधून प्रवास करणारे प्रवासी वाढत असल्याचे दिसून आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला आठवड्यापूर्वी हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर पुणेकरांचा मेट्रोला प्रतिसाद वाढताना दिसत आहे. 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान एकूण 3 लाख 2 हजार 904 प्रवाश्यांनी मेट्रोतून प्रवास केलाय. त्यामुळे अवघ्या सात दिवसांत पुणे मेट्रोची तब्बल 50 लाखांची उलाढाल झाली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांनी तर रविवारची सुट्टीच्या दिवशी मेट्रो प्रवासालाच पसंती दिली आहे. रविवारी दिवसभरात 96 हजारांहून अधिक जणांनी मेट्रोने प्रवास केला आहे. यातून 16 लाख 43 हजार रुपयांची कमाई झाली.

मेट्रोने प्रवास करणाऱ्यांना शनिवार अन् रविवारी सवलत दिली आहे. या दोन दिवसांत 30 टक्के सवलत दिली. यामुळे प्रवाशांची संख्या या दोन दिवसांत चांगलीच वाढ झाली आहे. रविवारी एकाच दिवसांत 96 हजार 498 प्रवाशांनी प्रवास केला. हा आठवडाभराचा विक्रम झाला होता. शनिवारी 57,652 जणांनी मेट्रोतून प्रवास केला होता. म्हणजे 30 टक्के सवलत योजनेचा चांगलाच फायदा प्रवासी घेत आहेत.

पुणे मेट्रो सार्वजनिक वाहतुकीसाठी पुणेकरांना चांगला पर्याय तयार झाला आहे. मेट्रोने प्रवास केल्यानंतर नागरिकांच्या वेळेची बचत होते आहे. तसेच रोज होणाऱ्या वाहतूक कोंडीतून त्यांची सुटका होत आहे. यामुळे पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या रोज वाढत आहेत. तसेच मेट्रोचा प्रवास प्रदूषणविहरीत आहे. यामुळे पुणे शहरातील वातावरण चांगले राहण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, मेट्रोचे जाळे निर्माण कऱण्याची मागणी आता वाढत आहे. पिंपरी चिंचवड शहरातून वाकड मार्गे हिंजवडी, बाणेर, तळेगाव स्टेशन, लोणावळा, चाकण, लोहगाव विमानतळ असा मेट्रोचा विस्तार केला पाहिजे, अशी मागणी पुढे आली आहे. थेट पुणे ते निगडी अशी मेट्रो प्रस्तावित आहे, पण तू सुरू झाली तर पुणे आणि पिंपरी चिचवड दरम्यान रोज धावणारी सरासरी तीन लाख वाहनांचा वापर कमी होईल, असा अंदाज आहे.