मेट्रोच्या वाहतूक नियंत्रकाचा मृत्यू

0
274

वल्लभनगर, दि. २ (पीसीबी) – वल्लभनगर बस स्थानकाच्या जवळ पुणे-मुंबई महामार्गावर मेट्रोचे काम सुरु असलेल्या ठिकाणी वाहतुकीचे नियमन करत असलेल्या मेट्रोच्या नियंत्रकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना 31 जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडली.

रहीमतुल्ला मेहबूब शरीफ शेख (रा. पिंपरगाव) असे मृत्यू झालेल्या नियंत्रकाचे नाव आहे. याबाबत त्यांच्या पत्नी सलीमा रहिमतुल्ला शेख (वय 45) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वल्लभनगर बस स्थानकाच्या जवळ जुना पुणे मुंबई महामार्गावर संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकाचे काम सुरु आहे. दरम्यान तिथे लोखंडी पूल बांधण्यात येत आहे. मयत रहिमतुल्ला हे एका कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून या मेट्रो स्थानकाच्या कामावर वाहतूक नियंत्रक म्हणून काम करत होते. 31 जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता अज्ञात वाहनाने रहिमतुल्ला यांना जोरात धडक दिली.

त्यात त्यांच्या डोक्याला, कपाळाला, नाकाला, डाव्या डोक्याला, हाताला, पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.