मुलाला खाऊ घेऊन जात असलेल्या व्यक्तीला मारहाण करून लुटले अन…

0
229

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) – मुलाला खाऊ घेऊन घरी पायी चालत जात असलेल्या व्यक्तीला सात जणांनी मिळून बेदम मारहाण केली. त्यानंतर बळजबरीने पाच हजार रुपये काढून घेतले. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या जखमी व्यक्तीच्या आईला देखील आरोपींनी शिवीगाळ आणि दमदाटी केली. ही घटना सोमवारी (दि. २९) रात्री रिव्हर रोड, पिंपरी येथे घडली.

मायकल उर्फ मॉन्टी राजेश डिसोझा (वय २९, रा. रिव्हर रोड, पिंपरी) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार सनी सौदाई (वय ३०), सचिन सौदाई (वय ३७), अजय टाक (वय २२), जतिन मेवाती (वय २१), अनिल पिवाल उर्फ बाबा (वय २७), तरुण टाक (वय २२), तौसिफ़ सय्यद (वय २१) आणि अन्य तीन अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डिसोझा सोमवारी रात्री साडेआठ वाजता रिव्हर रोड येथून मुलाला खाऊ घेऊन पायी चालत घरी जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना अडवले. डिसोझा यांना दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या खिशातील पाच हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. त्यांचे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी यांच्या आई आल्या असता त्यांनाही आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी केली. आरोपी सचिन सौदाई याने हा कट रचला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीसांनी सनी सौदाई याला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.