मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला वळवले; मनसेचा आरोप

0
526

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती भीषण असताना महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला दिले जात आहे. ४६ टीएमसी पाणी गुजरातला वळवले आहे.  तर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोटी माहिती दिली  आहे, असा आरोप मनसेचे नेते आणि माजी आमदार नितीन भोसले यांनी केला आहे.

राज्यातील १३ जिल्ह्यात भीषण दुष्काळ असतानाही महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी हे गुजरातच्या शेतीला दिले  जात आहे. मोदी आणि शहा जोडीला खुश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी गुजरातला पाणी दिले आहे, असा गंभीर आरोप भोसले यांनी केला आहे.

काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात पाणी देण्याचा असा कोणताही करार झाला नाही.  मुख्यमंत्री जाहीर भाषणात खोटी माहिती देत जनतेची दिशाभूल करत आहेत, असेही भोसले म्हणाले.  याबाबत मुख्यमंत्र्यांशी अनेकदा बोलणे झाले आहे. पण आमच्याकडे पैसा नसल्याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.  केंद्र जेव्हा पैसा देईल तेव्हा आम्ही विचार करू, असे मुख्यमंत्री सांगत आहेत, असे भोसले म्हणाले.