मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज उदयनराजेंचा अर्ज

0
103

दि १८ एप्रिल (पीसीबी ) – सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले आज शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी गांधी मैदानावरून महारॅली निघणार असून यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख सुनिल काटकर यांनी दिली आहे.

साताऱ्यातील गांधी मैदान येथून मोठे शक्ती प्रदर्शन करत महारॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. या महारॅलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार शिवेंद्रराजे भोसले, मकरंद पाटील, जयकुमार गोरे, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजपचे लोकसभा समन्वयक अतुल भोसले, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थिती राहणार आहेत.

खासदार उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची महारॅली सकाळी 11 वाजून 50 मिनिटानी गांधी मैदान येथून सुरू होणार असून गोलबाग-मोती चौक-देवी चौक-कमानी हौद-शेटे चौक, पोलिस मुख्यालय, गीते बिल्डिंग, शिवतिर्थ पोवई नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे या महारॅलीची सांगता होणार आहे. या महारॅलीसाठी सर्वांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन उदयनराजेंच्या प्रसिद्धी प्रमुखांकडून करण्यात आलं आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीपासून उदयनराजेंनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केल्याचं पाहायला मिळत होतं. अशातच आता युतीकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यामुळे आज अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात राजे समर्थक जमा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.