मुंबई पोलीस आयुक्तांचे आदेश; ‘विनावर्दी कारवाई नको, साध्या वेशात तर नाहीच नाही’

0
266

मुंबई, दि.१३ (पीसीबी) : यापुढे पोलिसांना कुठलीही कारवाई करताना कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी वर्दीत राहणे बंधनकारक असेल. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी तशा सूचना दिल्या आहेत. विनावर्दी लोकांवर कुठलीही कारवाई करू नका, असं पोलीस आयुक्तांनी बजावलं आहे. इतकंच नाही तर हा निर्णय वाहतूक पोलिसांनाही लागू असेल. वाहतूक पोलिसांनाही विना वर्दी आता गाड्या अडवता येणार नाही. काही ठिकाणी पोलीस साध्या वेशात कारवाई करताना आढळत आहेत त्यामुळे पोलीस आयुक्तांनी या सूचना दिल्या. विनावर्दी कारवाई करतानाचा फायदा तोतया अधिकारी घेऊ शकतात. त्यामुळे वर्दीत राहूनच जी काही असेल ती कारवाई करा, अशा सूचना हेमंत नगराळे यांनी दिल्या.

हेमंत नगराळे यांची मार्च 2021 मध्ये मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी पोलीस दलाबाबत विविध निर्णय घेतले. परमबीर सिंगांच्या जागी नियुक्त झालेल्या हेमंत नगराळेंनी आपला पहिला निर्णय विशेष पथकाच्या पुनर्रचनेचा घेतला होता. यापुढे मुंबई पोलीस दलात कोणत्याही विभागात विशेष पथक नसेल. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी हा निर्णय घेतला होता.

मुंबई पोलीस दलात पाच विभाग

कायदा आणि सुव्यवस्था
क्राईम
आर्थिक गुन्हे शाखा
प्रशासन
ट्राफिक

यापैकी कायदा आणि सुव्यवस्था, क्राईम आणि आर्थिक गुन्हे शाखा या तीन विभागात तपासाच्या अनुषंगाने वेगवेगळी पथक, सेल निर्माण केली जात असतात. मात्र आता असा प्रकार होणार नाहीत. कोणतेही विशेष पथक सुरु न ठेवण्याचा किंवा न बनवण्याचा निर्णय मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी घेतला आहे. हेमंत नगराळे हे 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. हेमंत नगराळे यांचा 19 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. हेमंत नगराळे यांनी 2016 मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कारभार स्वीकारला होता. त्यानंतर 2018 मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली. नगराळे याआधी पोलिस महासंचालक (विधी आणि तंत्रज्ञान) म्हणून कार्यरत होते. तर मार्च 2021 मध्ये परमबीर सिंह यांची उचलबांगडी करुन हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्तपदाचा चार्ज देण्यात आला.