मुंबई, दिल्लीची चिंता वाढवणारा हा आहे अंदाज..

0
200

मुंबई, दि. ८ (पीसीबी) : देशभरात कोरोना संसर्गबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. पुढील महिन्यात कोरोनाची तिसरी लाट धडकणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला होता. फेब्रुवारी महिन्यात दिवसाला सरासरी एक ते दीड लाख कोरोनाबाधित आढळण्याची शक्यता असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. तर, दुसरीकडे मुंबई, दिल्लीची चिंता वाढवणारा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या ‘सूत्र’ मॉडेलनुसारकोरोनाचा जोर आणखी वाढणार आहे.

आयआयटी कानपूरचे प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांनी पीटीआयला सांगितले की, कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनसह देशात फेब्रुवारीपर्यंत तिसरी लाट दिसू शकते. परंतु ती दुसऱ्या लाटेपेक्षा सौम्य असेल. ओमायक्रॉनची तीव्रता डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून आले असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. अग्रवाल यांनी ट्वीटमध्ये पुढे म्हटले की, या क्षणी भारतासाठी ठोस अंदाज वर्तवणे अधिक कठीण आहे. सूत्र मॉडेलनुसार अद्याप सध्याच्या परिस्थितीचा योग्य आढावा घेता आला नाही. जानेवारी-अखेर/फेब्रुवारी-सुरुवातीला मुंबईत कोरोनाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई, दिल्लीत कोरोनाचा जोर असताना काय स्थिती असणार?
मुंबईत कोरोनाचा जोर असताना दररोज सरासरी 30 ते 60 हजार कोरोनाबाधित आढळण्याची शक्यता आहे. त्यातील 3.5 टक्क्यांच्या आसपास बाधितांना रुग्णालयात दाखल करावे लागण्याची शक्यता आहे. कोरोनाचा जोर असताना किमान 10 हजार बाधितांसाठी रुग्णालयात व्यवस्था करावी लागणार आहे. त्यासाठीची पूर्वतयारी करावी लागणार आहे.
दिल्लीत कोरोनाचा जोर असताना दिवसाला 35 ते 70 हजार कोरोनाबाधित दिवसाला आढळण्याची शक्यता आहे. त्यावेळी 12 हजार बाधितांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासू शकते, असा अंदाज प्रा. अग्रवाल यांनी व्यक्त केला.
तिसऱ्या लाटेमुळे चिंता वाढणार?
प्रा. अग्रवाल यांनी ओमायक्रॉनबाबत बोलताना सांगितले की, नवा व्हेरियंट अधिक संसर्गजन्य असला तरी त्यात डेल्टा व्हेरियंटसारखी तीव्रता नाही. या व्हेरियंटमुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी आहे. मात्र, येत्या काही आठवड्यात काही गोष्टी बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे योग्य काळजी आणि सर्व व्यवस्था, नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले