मुंबईतील पावसाचा फटका टीव्ही इंडस्ट्रीला, अनेक मालिकांच्या शूटिंगला सुट्टी

0
393

मुंबई, दि, २ (पीसीबी) – सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी कोसळणाऱ्या पावसाचा मोठा फटका रोज घराघरात मनोरंजन करणाऱ्या टीव्ही इंडस्ट्रीलाही बसला. अनेक ठिकाणी दिलेल्या वेळेत कलाकार पोहोचू शकले नाहीत. तर बहुतांश ठिकाणी पावसाचे रौद्र रुप लक्षात घेऊन शूटना सुट्टी दिली आहे. त्यामुळे काही अंशी कलाकारांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. असे असले तरी जिथे सुट्टी नाही तिथे मात्र कॉल टाईमची वेळ पाळण्यासाठी कलाकारांना तुंबलेल्या पाण्यातून वाट काढत सेट गाठावा लागला.

चित्रीकरणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके चित्रनगरीला अर्थात फिल्मसिटीला या पावसाचा मोठा फटका बसला आहे. फिल्मसिटीच्या काही सखलभागात पाणी साचले आहे. अर्थात तिथून अद्याप शूट रद्द झाल्याची बातमी नाही. छत्रपती संभाजी, गुरूदेव दत्त आदी ठिकाणची शूट्स सुरू आहेत. तर बाळूमामाच्या सेटला मात्र सुट्टी देण्यात आली आहे.

अलिकडे ठाण्यात बरीच शूटस सुरु असतात. त्या अनेक शूटिंग्जना सुट्टी दिली आहे. यात ह.म.बने, तु.म.बने, घाडगे अँड सून यांचा समावेश होतो. शिवाय ठाण्यात माझ्या नवऱ्याची बायको या लोकप्रिय मालिकेचे शूटही सुरु असते. पावसाचे रौद्र रुप पाहता या शूटला सुट्टी देण्यात आली आहे. ह.म.बने.. मध्ये काम करणारी अभिनेत्री आदिती सारंगधर म्हणाली, दोन दिवसाच्या पावसाचा फटका आम्हा कलाकारांनाही बसला आहे. आमच्या मालिकेतील अभिनेता अजिंक्य जोशी याच्या घरात पाणी शिरल्यामुळे काल आणि आज असे दोन्ही दिवस शूटला सुट्टी दिली गेली. शिवाय, मुंबईच्या अनेक भागात पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा, तुंबलेलं पाणी पाहता आम्हाला सुट्टी दिली आहे.’