मुंबईतील ‘त्या’ रेव्ह पार्टी प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान एनसीबीच्या ताब्यात

0
194

मुंबई, दि.०३ (पीसीबी) : अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसबी) शनिवारी संध्याकाळी मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर छापा टाकत १२ लोकांना अटक केली आहे. ज्यामध्ये ९ पुरुष आणि ३ मुलींचा समावेश आहे. याप्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानलाही ताब्यात घेण्यात आलं आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खानने कबूल केले की तो या पार्टीचा भाग होता. त्याने चूक केल्याची कबुलीही दिली आहे. एनसीबीने शनिवारी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहेत. हे क्रूझ जहाज मुंबईहून गोव्याकडे जात होते. माध्यमांच्या वृत्तानुसार, ताब्यात घेतलेल्यांपैकी दोघे हरियाणा आणि दिल्लीतील ड्रग तस्कर आहेत. प्रत्येक व्यक्तीने या पार्टीत प्रवेशासाठी ८० हजार रुपयांपेक्षा जास्त फी भरली होती.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, मुंबई किनारपट्टीवर शनिवारी रात्री झालेल्या रेव्ह पार्टीच्या संदर्भात एनसीबी आर्यन खानची चौकशी करत आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे म्हणाले की, आर्यन खानवर कोणत्याही आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही किंवा त्याला आतापर्यंत अटकही करण्यात आलेली नाही. याप्रकरणी एनसीबीने क्रूझ पार्टीची आयोजन केलेल्या सहा आयोजकांनाही बोलावले आहे. एनसीबीने आर्यन खानचा फोन जप्त केला असून अधिकाऱ्यांकडून त्याची तपासणी केली जात आहे. एनसीबी जप्त केलेल्या फोनवरून चॅट्सचा तपास करत आहे. तसेच क्रूझवरून ताब्यात घेण्यात आलेल्या सर्वांचे मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत आणि सर्व तपशील देखील तपासले जात आहेत.

ठोस माहिती मिळाल्यानंतर, मुंबई झोनल संचालक समीर वानखेडे आणि इतर एनसीबी अधिकारी सामान्य प्रवासी म्हणून जहाजावर चढले होते. मुंबई सोडल्यानंतर जहाज समुद्राच्या मध्यभागी पोहोचताच रेव्ह पार्टी सुरू झाली. यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. एनसीबीने सात तास तपास करत बॉलिवूड कलाकाराच्या मुलासह १२ लोकांना ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर सर्वांना मुंबईत आणण्यात आले.

सात तासांच्या छाप्यादरम्यान एनसीबीच्या अधिकाऱ्यांना चार प्रकारचे ड्रग्स सापडली आहेत. यामध्ये एमडीएमए, मेफेड्रोन, कोकेन आणि चरस यांचा समावेश आहे. सात तासांच्या छाप्यादरम्यान एनसीबीच्या अधिकाऱ्यांना चार प्रकारचे ड्रग्स सापडली आहेत. यामध्ये एमडीएमए, मेफेड्रोन, कोकेन आणि चरस यांचा समावेश आहे. मात्र, तपास अद्याप सुरू आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी संध्याकाळी प्रवासी क्रूझवर छापा टाकण्यात आला, जिथे पार्टी चालू होती आणि त्यात ड्रग्जचे सेवन केले जात होते. हे जहाज गोव्याला जाणार होते आणि त्यावर शेकडो प्रवासी होते. जहाजावर पार्टी असल्याची माहिती मिळताच एनसीबीच्या पथकाने छापा टाकला. काही प्रवाशांकडून प्रतिबंधित अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.