मुंबईची अवस्था ‘आव जाव घर तुम्हारा और खर्चा पानी हमारा’; शिवसेनेची सामनातून परखड टीका

0
238

मुंबई,दि.२१(पीसीबी) : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी भूमिपुत्रांनाच सरकारी नोकऱ्या दिल्या जाणार असल्याचं म्हटलंय. यावरून आता शिवसेनेनं सामनाच्या आग्रलेखातून यावर परखड टीका केली आहे आणि मुंबईची अवस्था सांगत म्हण्टलं आहे कि, ‘पोटापाण्याच्या बाबतीत मुंबईची अवस्था ‘आव जाव घर तुम्हारा और खर्चा पानी हमारा’ अशी झाली आहे. मुंबईसह महाराष्ट्र देशाचं पोट भरतं. एकटे मुंबई शहर देशाच्या तिजोरीचा 25 टक्के हिस्सा भरतं, तेव्हा देशाचा गाडा पुढे सरकतो, पण एखाद्या संकटकाळी महाराष्ट्राने केंद्राकडे मदतीची मागणी केलीच तर मेहरबानीच केल्याच्या थाटात तुकडे फेकले जातात.’

‘आज उत्तर प्रदेश, बिहारात रोजीरोटीची नीट व्यवस्था नाही म्हणून त्या राज्यांतून रोज हजारो मजूर मुंबईकडे पळत आहेत. मध्यप्रदेशने तर दरवाजेच बंद करून ठेवले. त्यामुळे रोजगारासाठी हे लाखोंचे लोंढे पुन्हा मुंबईवरच येऊन आदळताना दिसत आहेत.’

‘त्यामुळे इतरांनी काखा वर केल्या तरी राष्ट्रीय एकात्मतेचे लचांड फक्त महाराष्ट्रालाच सांभाळावं लागेल. प्रत्येक राज्य हे आपापल्या लोकांची काळजी घेतच असतं, पण महाराष्ट्राने ती काळजी घेतली की, देशभरातील सगळ्यांचीच नरडी गरम होतात. मध्यप्रदेशने त्याच राष्ट्रीय एकात्मतेवर हातोडा मारला, तेव्हा सगळे चिडीचूप कसे आहेत?’ असा रोखठोक प्रश्नच शिवसेनेनं केला आहे.