मिलिंद नार्वेकर आणि अनिल परबांवर ‘या’ भाजप नेत्याने केला बेकायदेशीर बांधकामाचा आरोप

0
252

रत्नागिरी, दि,१८ (पीसीबी) : राज्यात भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये वारंवार कोणत्याही मुद्यावरून परस्परांवर टीकेची झोड उठत असते. याचबरोबर आता भाजपने काही नेत्यावरोधात तक्रार दाखल केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर तसेच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मुरुड समुद्र किनाऱ्यावरील बंगल्यांच्या बांधकामाला भाजपने तीव्र आक्षेप घेतलाय. ही बांधकामे बेकायदा असून ती तातडीने पाडण्याचे आदेश द्यावेत आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करावा, याबाबत मागणी भाजपचे जेष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केलीय.

मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्याचे बांधकाम CRZ ३ मध्ये येते. या बांधकामासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी नार्वेकर यांनी घेतलेली नाही, असा दावा भाजपचे जेष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. ‘मुख्यमंत्री कार्यालयाचा जबरदस्त दबाव असल्यामुळं रत्नागिरी जिल्हा प्रशासन या अनैतिक काम करणाऱ्या राजकीय नेत्यांची पाठराखण करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. किरीट सोमय्या यांनी आज मुरुड गावात जाऊन संबंधित बांधकामाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी उपविभागीय अधिकारी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा करून याबाबत पत्र देखील त्यांनी दिलंय

किरीट सोमय्या यांनी त्या पत्रात म्हटलं आहे की, ‘याआधी जून महिन्यात मी मुरुड गावात जाऊन संबंधित बांधकामाची माहिती घेतली होती. त्यानंतर ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन तक्रार केली. जिल्हाधिकारी, जिल्हा सागरी किनारा व्यवस्थापन समिती, महाराष्ट्र सागरी किनारा झोन व्यवस्थापन प्राधिकरण व पर्यावरण खात्याकडंही तक्रारी केल्या होत्या. पण, ग्रामपंचायत, तहसीलदार वा जिल्हाधिकारी कोणीही आजपर्यंत काहीही कारवाई केलेली नाही. आतातरी हे बांधकाम तोडावं, अशी मागणी त्यांनी केलीय. याबाबत त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केलाय. दरम्यान, राष्ट्रीय हरित लवादाकडं देखील या प्रकरणी सुनावणी सुरू झालीय. या प्रकरणातील आणखी पुरावे मी लवादापुढं सादर करणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे.