मावळ मतदारसंघात सरासरी ५९.४९ टक्के मतदान; उरण, कर्जत, मावळात सर्वाधिक मतदान

0
826

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. २९) मतदान झाले. सहा विधानसभा मतदारसंघात मिळून एकूण ५९.४९  टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघात ६०.११ टक्के मतदान झाले होते. आता २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्यात कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड, मावळ या तीन विधानसभा मतदारसंघांचा आणि रायगड जिल्ह्यातील कर्जत, उरण आणि पनवेल या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या सहाही मतदारसंघात एकूण २२ लाख ९७ हजार ४०५ मतदार आहेत. या मतदारांना मतदान करण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघात एकूण २ हजार ५०४ मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. सोमवारी सकाळी सात वाजता या सर्व मतदान केंद्रांवर मतदानाला सुरूवात झाली.

उन्हाचा पारा वाढल्यामुळे सकाळी मतदान करण्यासाठी मतदारांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे मावळ मतदारसंघात सकाळी सात ते नऊ या दोन तासात ६.६४ टक्के मतदान झाले. सकाळी ११ वाजेपर्यंत मतदान बारा टक्क्यांनी वाढून १८.११ टक्के झाले. त्यानंतर उन्हामुळे मतदान कमी होईल असा अंदाज बांधला जात होता. परंतु, मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला.

सकाळी ११ वाजेपर्यंत १८ टक्के झालेले मतदान पुढील दोन तासांत १३ टक्क्यांनी वाढून दुपारी एक वाजेपर्यंत ते ३१.८५ टक्के झाले. दुपारी तीन वाजेपर्यंत ४२.३७ टक्के मतदान झाले. त्यानंतरच्या दोन तासांत हेच मतदान ११ टक्क्यांनी वाढून ५३.१३ टक्के झाले. सायंकाळच्या वेळी मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर पडून सहा वाजेपर्यंत मतदानाचा टक्का जास्त वाढेल, असा अंदाज बांधला जात होता. प्रत्यक्षात एकूण ५९.४९ टक्के मतदान झाले आहे.