मावळ मतदारसंघातील पराभवाचे राष्ट्रवादी करणार चिंतन; ३१ मे पर्यंत अहवाल मागवला

0
547

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – मावळ लोकसभा मतदारसंघातील अजितदादांचे पुत्र पार्थ पवार यांच्या दारूण पराभवाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कारणमीमांसा सुरू झाली आहे. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसने शहराध्यक्षांना पत्र पाठवून ३१ मेपर्यंत निवडणुकीतील पराभवाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. हा पराभव गांभीर्याने घेत मावळ मतदारसंघातील बूथनिहाय डाटा सादर करावा, असा आदेशच दिला आहे. ज्या विधानसभा मतदारसंघात मताधिक्य कमी मिळाले, त्यामागील कारणे संबंधित पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार आहेत.

प्रदेश राष्ट्रवादीच्या आदेशानुसार अहवाल देण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कामाला लागले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात अजितदादांचे पुत्र पार्थ पवार राष्ट्रवादीचे उमेदवार होते. पवार घराण्यातील वारस निवडणुकीच्या मैदानात असल्यामुळे राष्ट्रवादीसाठी मावळची लढाई प्रतिष्ठेची बनली होती. परंतु, या लढाईत राष्ट्रवादीला नामुष्कीजनक दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे शहर राष्ट्रवादीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. पराभवाचे पडसाद शहर संघटनेतही उमटले. शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. परंतु, प्रदेशाध्यक्षांनी अद्याप तो स्वीकारलेला नाही.

पराभवानंतर प्रदेश कार्यालयाने शहर कार्यालयाला पत्र पाठवून पराभवाची कारणमीमांसा मागविली आहे. शहर कार्यालय, तालुकाध्यक्ष, विधानसभा मतदारसंघ, नगरपालिका क्षेत्र अध्यक्ष, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रातील माहिती द्यावयाची आहे. पक्षाच्या उमेदवाराला मिळालेली मते, विरोधी उमेदवारांनी घेतलेली मते, विरोधकांनी आघाडी घेतली असल्यास त्यामागील कारणेही अहवालात नमूद करावयाची आहेत.

पक्षाच्या आदेशानुसार २९ मेपर्यंत जिल्हा कार्यालयाकडे संबंधितांनी अहवाल सादर करायचा आहे. संपूर्ण जिल्ह्यातील अहवाल मिळाल्यानंतर पक्षाचे जिल्ह्याचे नेते संयुक्त बैठक घेणार आहेत. त्यामध्ये पराभवाची कारणमीमांसा, जिल्ह्यातील अहवालावर चर्चा होऊन जिल्हा कार्यालयातर्फे प्रदेशकडे निवडणुकीचा अहवाल पाठवला जाणार आहे. त्यावर प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा होणार आहे.