मावळमधून श्रीरंग बारणे उमेदवार असले तरी लक्ष्मण जगतापच ठरणार युतीचे किंगमेकर!

0
1710

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – शिवसेनेने मावळ लोकसभा मतदारसंघ भाजपसाठी सोडला नसला, तरी या निवडणुकीत चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार व भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप हेच युतीचे “किंगमेकर” असणार आहेत. या मतदारसंघात शिवसेनेने पुन्हा एकदा विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर केली असली तरी, आमदार जगताप यांची पिंपरी-चिंचवडसह घाटाखाली सुद्धा असणारी राजकीय ताकद आणि योग्यवेळी बेरजेचे राजकारण करण्याचे त्यांचे अचूक टायमिंग यामुळे मावळ मतदारसंघात सध्या त्यांच्याच नावाभोवती चर्चा होताना दिसते.

आमदार जगताप हे एकदा विधान परिषदेवर आणि एकदा विधानसभेवर अपक्ष निवडून आले. गेल्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाच्या पाठिंब्यावर ते अपक्ष लढले होते. मोदी लाटेमुळे त्यांचा घात झाला आणि शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. परंतु, मोदी लाटेतही त्यांना तब्बल ३ लाख ५४ हजार ७३० मते मिळाली. त्यावरून आमदार जगताप यांच्या राजकीय ताकदीचा अंदाज येतो.

गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आमदार जगताप २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर आमदार झाले. त्यानंतर भाजपचे शहराध्यक्ष बनले. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता खेचून घेत प्रथमच कमळ फुलवले. आमदार जगताप यांनी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा बालेकिल्ला उद्धवस्त करून आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली. त्यामुळेच मावळ लोकसभा मतदारसंघ युतीच्या जागा वाटपात भाजपला मिळावा, यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केले.

या मतदारसंघात शिवसेनेपेक्षा निश्चितच भाजपची ताकद मोठी असूनही शिवसेनेने ताठर भूमिका घेतली. मावळ मतदारसंघ भाजपला देणार नसल्याची भूमिका कायम ठेवली. या एका मतदारसंघावरून संपूर्ण राज्यात युतीवर परिणाम होऊ नये म्हणून भाजपने नरमाईची भूमिका घेत आमदार जगताप यांची समजूत घातली. त्यामुळे आमदार जगताप यांनीही पक्षश्रेष्ठींचा आदेश मानला आणि शांत झाले. त्यानंतर आता या मतदारसंघातून शिवसेनेने विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे.

खासदार बारणे यांचे पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय अस्तित्व नगण्य आहे. स्वतःच्या विजयात परावर्तित होईल, एवढी राजकीय ताकद त्यांची निश्चितच नाही. गेल्यावेळी मोदी लाटेसोबतच राष्ट्रवादीतील बेदिलीचा फायदाही बारणे यांना झाला होता. मात्र यावेळी चित्र वेगळे आहे. स्वतः अजितदादांचे पुत्र पार्थ पवार हे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादीचे सर्व नेते एकदिलाने काम करणार हे निश्चित आहे. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेचा विजय हा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भूमिकेवरच ठरणार आहे. त्यांची पिंपरी-चिंचवडसह घाटाखाली सुद्धा असणारी राजकीय ताकद आणि योग्यवेळी बेरजेचे राजकारण करण्याचे त्यांचे अचूक टायमिंग यामुळे मावळ मतदारसंघात सध्या त्यांच्याच नावाभोवती चर्चा होताना दिसते. आता शिवसेना त्यांना कितपत सोबत घेऊन काम करते, यावरच मावळ लोकसभा मतदारसंघाचा निकाल अवलंबून असणार आहे.