माझ्यासह काँग्रेसचे ७ आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील; अब्दुल सत्तारांचा गौप्यस्फोट

0
449

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – वऱ्हाड निघालं लंडनला हे खूप गाजलेले नाटक होते, पण आमच्या बाबतीत वऱ्हाड निघाले भाजपकडे असे म्हणावे लागेल,  असे म्हणत काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसचे सात आमदार भाजपमध्ये  प्रवेश करतील, असे म्हटले आहे. मी एकटाच नाही तर माझ्यासह काँग्रेसचे ७ आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे.   

काँग्रेस आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तसेच त्यातील काही मंत्रीपदाची शपथही घेतील, असेही सत्तार यांनी म्हटले आहे.

माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे,  वडाळ्याचे आमदार कालिदार कोळंबकर, पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके यांच्यासह कोल्हापुरातून लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले धनंजय महाडिक  आदी नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

मुंबईतील कृपाशंकर सिंग, सांगलीतील प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख, आमदार विश्वजित कदम यांचेही  नाव चर्चेत आले होते. मात्र, आपण पक्ष सोडणार नसल्याचे विश्वजित कदम यांनी स्पष्ट केले आहे.