‘माझ्यावर पाळत ठेवली जातेय, गुन्ह्यातील साक्षीदारांवर दबाव’ ; अनुप डांगेंचा गंभीर आरोप

0
346

मुंबई, दि.२३ (पीसीबी) : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार सरकारकडे केल्यानंतर या तक्रारीचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देण्यात आला. ”या गुन्ह्यातील साक्षीदारांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप तक्रारदार पोलिस निरीक्षक अनुप डांगे यांनी केला आहे.

“आपल्यावरही पाळत ठेवली जात असल्याचे डांगे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस संचालकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. परमबीर यांच्या अडचणी वाढत असताना दुसरीकडे असे आरोप होऊ लागल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर बनत चालले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. डांगे यांच्याबरोबरच या प्रकरणातील साक्षीदारांचे जबाब नोंदविले जात आहेत. अशातच वेगवेगळ्या क्षेत्रातील मोठमोठे लोक फोन करून या साक्षीदारांवर दबाव आणत आहेत.

”आपण कुठे जातो, कुणाला भेटतो हे जाणून घेण्यासाठी आपल्यावरही पाळत ठेवली जात आहे,” असा आरोप करणारे पत्र डांगे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस संचालकांना पाठविले आहे. ”’माझ्या जीवाला काही लोकांपासून धोका असून माझे बरेवाईट झाल्यास किंवा अपघाती मृत्यू झाल्यास या व्यक्तींना जबाबदार धरण्यात यावे,” असे डांगे यांनी पत्रात नमूद केल आहे. या पत्रामध्ये काही व्यक्तींच्या नावाचा उल्लेख केला आहे.

परमबीर सिंह यांच्यावर आतापर्यंत चार गुन्हे दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. वाझे आणि अन्य दोन पोलिसांना देशमुख यांनी मुंबईतील हॉटेल व्यावसायिक व बार मालकांकडून १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा आरोप करण्यात आला आहे. परमबिर सिंह याच्या लेटरनंतर देशमुखांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. ईडीनं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मोठ्या सुट्टीवर गेलेले परमबिर सिंह मात्र अद्याप हजर न झाल्यामुळे वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहे. परमबीर हे त्याची नियुक्ती केलेल्या गृहरक्षक दलाचे संचालक म्हणून काही दिवस हजर झाले आणि ५ मे रोजी सुट्टीवरही गेले. ते आजपर्यंत हजर झालेले नाहीत. ते महिनाभारापासून आजारपणामुळे देशाबाहेर गेल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यांच्या चंदीगड येथील घराला कुलूप आहे.