मागील निवडणुकीत मला तुम्ही पळायला लावले, तसे यावेळी करू नका – उद्यनराजे

0
495

सातारा, दि. २९ (पीसीबी) –  जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठीच मी भाजपासोबत आलो आहे. विधानसभा निवडणुकीतही महायुतीच्याच सर्वच उमेदवारांचा जाहीर प्रचार करणार आहे, मात्र मागील निवडणुकीत मला तुम्ही पळायला लावले तसे यावेळी करू नका, अशी विनंती माजी खासदार उद्यनराजे भोसले यांनी कार्यकर्त्यांना  केली.

उद्यनराजे यांनी राष्ट्रवादीला सो़डचिठ्ठी देताना खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी विधानसभेसोबत मतदान होत आहे. त्यासाठी उदयनराजे भोसले यांनी तयारी सुरु केली आहे. सातारा येथे त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

उदयनराजे म्हणाले की,  माझ्यावर इतक्या केसेस कशा आहेत, असे मला निवडणूक आयोगाने विचारले होते. यावर मी त्यांना सांगितले मला अन्याय सहन होत नाही. माझ्याशिवाय दुसरा तुमची कोण काळजी घेणारा असेल, तर सांगा मी त्यांचा मुख्यप्रचारक म्हणून काम करतो.

दरम्यान, उदयनराजे यांनी आपण लोकसभेसाठी आणि शिवेंद्रराजे विधानसभेसाठी १ ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करणार आहोत, असेही सांगितले. त्यामुळे आता आघाडीतर्फे  उद्यनराजे यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी मिळते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.