”महिला दिनी स्त्री शक्तीला भेट, सर्व घटकांना न्याय देणारा महाविकास आघाडी सरकारचा अर्थसंकल्प”

0
244

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांच्याकडून अर्थसंकल्पाचे स्वागत

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) – महिला, शालेय विद्यार्थीनींसाठी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले योजनेव्दारे महिला दिनी राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्त्री शक्तीला भेट दिली आहे. तर, केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातून देशभरातील नागरिकांची निराशा झाली होती. राज्यातील नागरिकांची ही निराशा दूर करणारा राज्यातील सर्व घटकांचा, सर्व भागांसाठी भरीव तरतुदी असलेला हा सर्वसमावेशक असा महाविकास आघाडी सरकारचा अर्थसंकल्प आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.

राज्य सरकारचा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभेत आज सादर केला.‌ या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया मांडताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी म्हटले आहे की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत बारावीपर्यंतच्या मुलींना एसटीबसचा मोफत प्रवास, तसेच महिलांसाठी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेव्दारे महिलेच्या नावावर घर घेतल्यास नोंदणी शुल्कात १ टक्का सवलत देण्यात येणार आहे. या निर्णयाची 1 एप्रिल 2021 पासून अंमलबजावणी करण्याचीही घोषणा अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पात केली आहे. याबरोबर आरोग्य सुविधांवर भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. जिल्हानिहाय विविध उपाययोजना करून आरोग्य सुविधा सक्षमीकरणावर भर देत जनसामान्यांच्या प्राथमिक गरजांवर लक्ष देणारे महाविकास आघाडी सरकार असल्याचे दाखवून दिले आहे.

शेतक-यांसाठी विविध योजना जाहीर करत, भरीव तरतुदीचा समावेश अर्थसंकल्पात केल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारने रस्ते, रेल्वे प्रकल्प, भौतिक सुविधांना गती देण्याबरोबर सर्व घटकांना विकासाच्या वाटेवर घेऊन जाणारा हा अर्थसंकल्प राज्याला दिला आहे. आयटी पार्क उभारण्याचा निर्णय हा राज्यात मोठा रोजगार निर्माण करणारा आहे. पुणे – नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गाची घोषणा केली असून त्यासाठी भरीव तरतूद केली आहे. औंध येथे रुग्णालयासाठी तरतूद केलेली आहे. मोशी येथे आरोग्य प्रशिक्षण केंद्र उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. पुण्यात क्रीडा विद्यापीठ स्थापनेसाठी घोषणा करण्यात आली आहे. पुण्यातील वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पासाठी तरतूद केलेली आहे. या योजनाचा लाभ पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील आणि जिल्ह्यातील नागरिकांना होणार आहे. यासह जिल्हा रुग्णालयाचे सक्षमीकरण, कर्करोग निदान सुविधा, एसटी बस आगारांचा विकास, धनगर समाजासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी विविध योजनांचा अर्थसंकल्पात समावेश आहे. अशा प्रकारे सर्व घटकाला न्याय देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे संजोग वाघेरे-पाटील यांनी म्हटले आहे.