‘महाराष्ट्र, तामिळनाडूसारख्या मोठ्या राज्यांशी केंद्र सरकार झारखंडची तुलना का करत आहे ?’

0
263

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – महाराष्ट्र, तामिळनाडूसारख्या मोठ्या राज्यांशी केंद्र सरकार झारखंडची तुलना का करत आहे, असा रोखठोक प्रश्न झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी उपस्थित केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अनेक अधिकार पूर्णपणे स्वत:कडेही घेतले नाहीत आणि राज्यांनाही दिले नाहीत असं सांगतानाच कोरोनासारख्या राष्ट्रीय प्रश्नावर केंद्र सरकारने तुमचं तुम्ही बघा असं धोरण राज्यांबाबतीत घेतल्याची टीका सोरेन यांनी केलीय. मोदी सरकारने राज्यांच्या समस्येंकडे पाठ फिरवल्याची तक्रार करतानाच कोरोना साथीच्या नियोजनासंदर्भात सरकारने केलेल्या अपुऱ्या तयारीवरुन केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकार करोनाच्या साथीला राष्ट्रीय समस्या मानत नाहीय तसेच राज्यांनी केलेल्या मागण्या ऐकून समोर आलेल्या परिस्थितीला राज्यांनी आपल्या पद्धतीने तोंड द्यावं असं केंद्राचं धोरण असल्याची नाराजी सोरेन यांनी व्यक्त केलीय. द संडे एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोरेन यांनी रोकठोकपणे आपली मतं मांडली आहे.

झारखंडमधील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी राज्य सरकारला साडेतीन ते चार कोटी लसी विकत घ्याव्या लागतील असं सोरेन यांनी सांगितलं. आम्हाला आतापर्यंत ४० लाख लसींचे डोस मिळाले आहेत. मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील नागरिकांच्या लसीकरणासाठी जागतिक निविदा काढलीय. यासाठी खूप जास्त खर्च येतो. झारखंड सरकार असं करु शकत नाही, असा सोरेन यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. “लसी घेण्यातच आमचं दिवाळं निघेल. राज्यांना सध्या लसींसंदर्भातही स्वत:च नियोजन करण्यास सांगण्यात आलं आहे. आम्ही याचं नियोजन कसं करायचं. केंद्र सरकार महाराष्ट्र आणि तामिळनाडूशी झारखंडची तुलना का करत आहे. आमचं बजेट खूप कमी आहे,” असं सोरेन म्हणाले.

रांची येथील आपल्या निवासस्थानी दिलेल्या या मुलाखतीमध्ये, “कोरोना एक राष्ट्रीय स्तरावरील समस्या आहे की राज्यातील समस्या आहे? केंद्राने या परिस्थितीमध्ये जबाबदारी पूर्णपणे राज्यांनाही दिलेली नाही आणि स्वत:सुद्धा ती पूर्णपणे स्वीकारलेली नाही. आम्हाला औषधं मागवता येत नाहीत कारण केंद्राने त्यासाठी परवानगी दिलेली नाही. मात्र केंद्र सरकार त्यांना वाटेल त्या पद्धतीने औषध आयात करतं,” असं सोरेन म्हणाले आहेत. “केंद्राने करोना परिस्थितीसंदर्भातील सर्व महत्वाच्या गोष्टींचं नियंत्रण स्वत:कडे ठेवलं आहे. मग ते अगदी ऑक्सिजनचा पुरवठा असो, वैद्यकीय उपकरणांचं वाटप असो किंवा लसींचं वितरण असो,” असं सोरेन म्हणाले आहेत. सगळं नियंत्रण स्वत:कडे ठेऊनही केंद्र सरकारकडून आम्हाला आवश्यक असणारा गोष्टी मिळत नसल्याची तक्रार सोरेन यांनी केलीय. राज्यांना ना योग्य प्रमाणात औषधं दिली जात ना लसी दिल्या जात, असं म्हणत सोरेन यांनी आपला संताप व्यक्त केलाय.

“आम्हाला कोणासोबत लढण्याची हौस नाहीय,” अशी प्रतिक्रिया मोदींसंदर्भात केलेल्या ट्विटवर सोरेन यांनी दिलीय. या महिन्याच्या सुरुवातीला सोरेन यांनी पंतप्रधानांसंदर्भात एख ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये सोरेन यांनी पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीमध्ये कोणाला बोलूच न देता स्वत:च बोलत राहिले असं म्हटलं होतं. यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता सोरेन यांनी, मोदी त्यादिवशी बैठकीमध्ये बोलले. त्याचं बोलणं झाल्यानंतर ती बैठक टीव्हीवर लाइव्ह दाखवण्यात आल्याचं सांगितलं. हे राजकारणापेक्षाही भयंकर होतं. ते म्हणजे त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची फॉरमॅलिटी पूर्ण केल्यासारखं वाटत होतं, असं सोरेन म्हणाले.