‘महाराष्ट्राच्या भाविक जनतेनी राज्यभरात केलेला घंटानाद अखेर मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या कानी घुमला’ – आचार्य तुषार भोसले

0
236

मुंबई,दि.१(पीसीबी) :२०२०संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात माॅल, मांस, मदिरा चालु झाले आणि देवस्थाने मात्र बंद आहेत. देशभरातील बहुसंख्य व प्रमुख देवस्थाने सुरु देखील करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातही देवस्थाने सुरु करण्याची अनेक व्यक्ती तसेच संघटनांनी महाराष्ट्र सरकारकडे खूप वेळा मागणी केली. राज्यशासन ठरवेल ते सर्व नियम मान्य करुन देवस्थाने सुरु करावे, ही सर्वांची एकमुखाने मागणी असतानाही , महाराष्ट्रातले मविआ सरकार ती अजूनही मान्य करत नाही याकरिता महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक-आध्यात्मिक संघटना, संस्था, प्रमुख देवस्थानांचे अध्यक्ष, विश्वस्त आणि विविध पंथ- संप्रदायांच्या प्रमुख धर्माचार्यांनी एकत्र आध्यात्मिक समन्वय आघाडी च्या समन्वयातून राज्य सरकारला इशारा देण्याकरिता शनिवार दि. २९ ऑगस्ट २०२० रोजी, सकाळी ११ वाजता “दार उघड उद्धवा, दार उघड” अशी हाक देत राज्यव्यापी “घंटानाद आंदोलन” पुकारण्यात आले होते.

या आंदोलनाला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री. चंद्रकांतदादा पाटील यांनी पाठिंबा दिला आणि भाजपाचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी या आंदोलनात सक्रिय सहभागी झाले. तसेच विश्व हिंदु परिषद, अ.भा.आखाडा परिषद, अ.भा.संत समिती, अ.भा.वारकरी मंडळ,वारकरी महामंडळ, अ.भा.पुरोहित संघ,जय बाबाजी भक्त परिवार यांच्यासह वारकरी,महानुभाव,लिंगायत,जैन,शीख,सिंधी,बौद्ध संप्रदायांच्या अनेक आणि महाराष्ट्रातील एकूण १३६ प्रमुख धार्मिक संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या. प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार राज्यातील सर्व संप्रदायांची प्रमुख मंदिरे, गुरुद्वारा, जैन मंदिरे-स्थानक, बौद्ध विहार अशा एकूण १०,००० पेक्षा ही जास्त देवस्थानांच्या प्रवेशद्वारांसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. तसेच राज्यातील प्रमुख तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी हे आंदोलन अधिक तीव्र स्वरुपात झाले, त्यामध्ये तेथील देवस्थानांवर उपजीविका अवलंबून असलेले सर्व व्यावसायिक देखील सहभागी झाले.

गेल्या ३ दिवसांपासून शासकीय स्तरावरुन या आंदोलनात सहभागी झालेल्या व्यक्तींसोबत संपर्क करुन सांगण्यात येत आहे की, येत्या आठ दिवसांत आम्ही देवस्थाने सुरु करीत आहोत. “महाराष्ट्रातील साधु-संतांनी , भाविक जनतेनी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात केलेला हा घंटानाद अखेर मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या कानी घुमला आणि त्यांनी जनभावनेची दखल घेतली” , या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. तसेच अपेक्षा करतो की, आपल्या शब्दाला जागून मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे येत्या आठ दिवसांत देवस्थाने सुरु करतील.