महाराष्ट्राचे बाद फेरीच्या दिशेने भक्कम पाऊल

0
447

अयोध्या (उत्तर प्रदेश), दि.१५ (पीसीबी) : महाराष्ट्राने रामजन्मभूमीत आपली आगेकूच कायम राखली. महाराष्ट्राने ६८व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद करताना आज गुजरातचा ५१-१९ असा धुव्वा उडवला. सलग दोन विजय मिळविल्यामुळे आता महाराष्ट्राची बाद फेरी निश्चित झाली आहे. आता गटातील अखेरचा उत्तचराखंडविरुद्धचा सामना महाराष्ट्र कसे खेळतो हे पाहणे महत्वाचे ठरेल.

पहिल्या सामन्यात विश्रांतीपर्यंत निर्विवाद राखलेले वर्चस्व कायम राखण्यात महाराष्ट्राला अपयश आले होते. प्रतिस्पर्धी कुठलाही असला, तरी त्याला ठेचतच पुढे जायचे हे कदाचित महाराष्ट्र पहिल्या सामन्यात विसरला. त्यामुळे त्यांचे विजयाधिक्य कमी झाले. दुसऱ्या सामन्यात मात्र, त्यांनी या सगळ्या चुका सुधारल्या आणि गुजरातला साफ निष्प्रभ केले.

येथील भीमराव आंबेडकर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राने पहिल्या दोन झटापटीचे क्षण वगळता गुजरातला खेळ दाखविण्याची संधीच दिली नाही. तीन मिनिटात दोन लोण देत त्यांनी आपले मनसुबे स्पष्ट केले. सातव्या मिनिटाला लोण देत ११-४ अशी आघाडी घेतली. तीन मिनिटांनी दुसरा लोण देत त्यांनी २०-४ अशी आपली आघाडी भक्कम केली. विश्रांतीला त्यांनी २६-६ अशी आघाडी घेतली.

उत्तरार्धात महाराष्ट्राने आपले तेच धोरण कायम राखले. गुजरातवर हे आक्रमण एखाद्या लाटेसारखे होते. त्यांना काय करायचे काय नाही याबाबत काहीच कळत नव्हते. प्रशिक्षकही गडबडून गेले. त्यांच्या या गोंधळलेल्या अवस्थेचा पुरेपूर उपयोग करून घेत महाराष्ट्राने आपली आघाडी अधिक भक्कम केली. उत्तरार्धात आणखी दोन लोण देत त्यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. महाराष्ट्राने आजही सिद्धेश देसाई आणि रिशांक देवाडिगाचा पूर्ण क्षमतेने विचार केला नाही. गुजरातचे आव्हान परतवून लावण्यास पंकज मोहिते आणि अजिंक्य पवारच्या चढाया निर्णायक ठरल्या. शुभम शिंदे आणि गिरीश इरनाक यांच्या भक्कम बचावाची त्यांना सुरेख साथ मिळाली.

अन्य निकाल १) इ गटात हरीयाणा वि.वि. मध्य प्रदेश (३८-३३); २) ड गटात चंदीगड वि.वि. आसाम (४८-०८); ३)ब गटात सेनादल वि.वि. दिल्ली (५३-२९); ४) भारतीय रेल्वे वि.वि. झारखंड (३३-१४); ५) ह गटात उत्तरांचल वि.वि. गुजरात (३५-३४