महापालिकेच्या सर्व विभागांनी नियमांनुसारच मोजमाप पुस्तके तयार करून दफ्तरी ठेवावेत; लेखा विभागाचा आदेश

0
306

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या काही विभागांमार्फत निविदेतील कामकाज पूर्ण झाल्यानंतर व अनामत रक्कम पूर्ततेपूर्वी संपूर्ण निविदा फायलींचे निविदा सुरू झाल्यापासूनच्या सर्व बिलांसहित लेखापरीक्षण केले जाते. मात्र, हे लेखापरीक्षण करताना नियमांनुसार मोजमाप पुस्तकांमधील नोंदी ठेवल्या जात नाहीत. यापुढे महापालिकेच्या सर्व विभागांनी महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियम पुस्तकामधील नियमांनुसारच मोजमाप पुस्तके तयार करून दफ्तरी ठेवण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना लेखा विभागाने दिल्या आहेत.

 महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षण विभागामार्फत लेखापरीक्षण कामकाज गतिमान करण्यासाठी प्रचलित लेखापरीक्षण कार्यपद्धतीमध्ये आर्थिक वर्ष सन 2022-23 पासून सुधारणा करण्यात आली आहे. या कामकाजाच्या अनुषंगाने स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा व जलनि:सारण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या निविदेतील कामकाज पूर्ण झाल्यानंतर व अनामत रक्कम पूर्ततेपूर्वी संपूर्ण निविदा फायलींचे निविदा सुरू झाल्यापासूनच्या सर्व बिलांसहित लेखापरीक्षण केले जात आहे. हे लेखापरीक्षण करीत असताना मोजमाप पुस्तके संबंधित फायलींसोबत लेखापरीक्षणासाठी प्राप्त होत असतात.

याबाबत राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेल्या नियमावलीतील तरतुदी लागू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार मोजमापे घेण्याबद्दलचे आणि मोजमाप नोंदवह्या ठेवण्यासंबंधी तरतुदी करण्यात आल्या आहेत. मोजमाप पुस्तक संगणकीकृत मोजमापे नोंदी करताना या नियमातील तरतुदींचे पालन होणे अपेक्षित आहे. तथापि, तशी कार्यवाही होत नसल्याचे आढळून येत आहे.

लेखापरीक्षणात मोजमाप पुस्तकातील नोंदीबाबत आक्षेप घेतला असता, उणिवांची दुरुस्ती करून पूर्वीचे पृष्ठ काढलेले असल्याचे व दुरुस्तीचे पृष्ठ नव्याने समाविष्ट केल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच मोजमाप पुस्तकाचे नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करून त्यांच्यामार्फत पुस्तकास क्रमांक देणे, तसेच पृष्ठांकन करण्याचे अधिकार देणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले यांनी धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार महापालिकेच्या सर्व विभागांनी महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियम पुस्तकामधील नियमांनुसारच मोजमाप पुस्तके तयार करून दफ्तरी ठेवण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.

ठेकेदाराचीही सही घेणार

गोषवाऱ्यात केलेल्या कामाची बाबनिहाय एकूण संख्या, त्याचा दर व रक्कम दर्शविण्यात यावी, नोंद केलेली मोजमापे ही ठेकेदाराने स्वीकारण्याचे दर्शक म्हणून ठेकेदाराची सही घ्यावी, कामाचे बिल तयार केल्यानंतर मोजमाप पुस्तकात प्रत्येक पृष्ठावर लाल शाईने एक कर्णरेषा काढण्यात यावी, बिल संमत केल्यानंतर लाल शाईने दुसरी कर्णरेषा खोडून टाकावी, मोजमापाच्या गोषवाऱ्याखाली रकमेस संमत केले आहे अशा एकूण व निव्वळ रकमा नमूद कराव्यात. त्या ठिकाणी प्रमाणक क्रमांक, दिनांक दर्शविणारे मुखांकन लाल शाईत करण्यात यावे, शासनाच्या पूर्वमान्यतेशिवाय खात्याच्या प्रमाण नमुन्यांमध्ये फेरबदल करता येणार नाही, असे तरतुदीत स्पष्ट करण्यात आले आहे.

मोजमापविषयक नोंदवह्या पुरवठा म्हणून दाखल कराव्या लागण्याची शक्यता असल्यामुळे या नोंदवह्या अतिशय महत्त्वाचे लेखाविषयक अभिलेख समजण्यात याव्यात आणि काळजीपूर्वक व्यवस्थितपणे, अचूकपणे ठेवण्यात याव्यात. तसेच मोजमाप पुस्तके ही रोख पुस्तके आणि महत्त्वाची लेखाविषयक कागदपत्रे काळजीपूर्वक जतन करून ठेवावीत. मोजमापे नोंदविण्याचा अधिकार हा अभियंतापदावर किमान दोन वर्षे सेवा झालेल्या अधिकाऱ्यांना राहणार आहे. मोजमाप पुस्तक हे कनिष्ठ अभियता किंवा शाखा अभियंता यांना तारीख नमूद करून विभागीय किंवा उपविभागीय कार्यालयांमधून देण्यात यावे.

मोजमाप पुस्तक व त्यांची पृष्ठे यांना यंत्रांच्या साहाय्याने क्रमांक देण्यात यावेत. त्या मिळाल्याच्या, देण्यात आल्याच्या आणि विभागीय कार्यालयास परत करण्यात आल्याच्या तारखा दर्शविणारी एक नोंदवही निश्चित नमुन्यात विभागीय कार्यालयात ठेवण्यात यावी. संबंधित अधिकाऱ्याची बदली झाल्यास त्याने त्याच्याकडील सर्व मोजमापविषयक नोंद वह्या त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांकडे हस्तांतरित कराव्यात आणि कार्यमुक्त व कार्यमोचक अधिकाऱ्यांनी तारखेनिशी त्यांच्या सह्या करून नोंदवह्यांच्या सूचीत नोंद करावी. मोजमाप नोंदवहीत नोंद केल्यानंतर नोंद करणाऱ्या अधिकाऱ्याने आपण स्वतः हिशेब केल्याचे व त्याच्या नोंदी केल्याचे तारखेनिशी आपल्या सहीने प्रमाणित करावे. मोजमाप नोंदवहीतून कोणतेही पृष्ठ काढून टाकू नये. आवश्यक नसल्यास सर्व कोरी पृष्ठे नोंदवहीची नोंद होण्यापूर्वी तारखेनिशी सही करून रद्द करण्यात यावीत. प्रदानांची एकूण संख्या अक्षरात लिहावी. मोजमापे पूर्ण नोंद झाल्यानंतर त्याचा गोषवारा तयार करावा, असे लेखा विभागाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.