एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आणि नक्कल केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या मोठ्या नेत्यांवर गुन्हे दाखल…!

0
205

मुंबई,दि.१२(पीसीबी) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य आणि नक्कल केल्याप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, उपनेत्या सुषमा अंधारे, अनिता बिर्जे, धर्मराज्य पक्षाचे राजन राजे, माजी नगरसेवक मधुकर देशमुख, समालोचक सचिन चव्हाण असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे. तर याप्रकरणी शिंदे गटाचे नौपाडा येथील उपविभाग प्रमुख दत्ताराम गवस यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे ठाकरे गटातर्फे रविवारी (ता.९) महाप्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह ठाण्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्तव्य करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मालिन केल्याचा शिंदे गटाने ठाकरे गटातील नेतेमंडळींवर आरोप केला आहे.

शिंदे गटाचे नौपाडा येथील उपविभाग प्रमुख दत्ताराम गवस यांनी महाप्रबोधन यात्रेचे झालेल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य आणि त्यांची नक्कल करण्यात आली आहे. असे तक्रारीत म्हटले आहेत. त्यानुसार शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात सातत्याने संघर्ष होताना दिसत आहे. दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. या दोन गटांमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच तीव्र होताना दिसत आहे. एकमेकांच्या गटातील नेतेमंडळींवर जाहीर टीका करण्यात दोन्ही गटाचे नेते आघाडीवर असल्याचे कायमच दिसून आले आहे. पण आता या २ गटांमधील संघर्षाला वेगळे वळण मिळताना दिसत आहे.