महापालिकेच्या वैद्यकीय विभागात नोकर भरती; 128 जागांसाठी होणार ऑनलाईन परीक्षा

0
422

पिंपरी दि. ९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेची रूग्णालये आणि दवाखान्यांसाठी ‘अ’ ते ‘क’ संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरती करण्यात येणार असून 128 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्यात 19 हजार 15 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या उमेदवारांच्या ऑनलाईन परिक्षेचे कामकाज ’टीसीएस’ या संस्थेला दिले आहे. त्यासाठी सुमारे 81 लाख 76  हजार रूपये खर्च होणार आहे.

पिंपरी – चिंचवड शहराची लोकसंख्या सध्या 25 लाखांवर आहे. या लोकसंख्येनुसार, नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेचे शहरात 32 दवाखाने आहेत. तर, आठ रूग्णालये आहेत. संत तुकारामनगर येथे पिंपरी – चिंचवड महापालिकेचे 750 खाटांचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आहे. या दवाखाने आणि रूग्णालयांसाठी तज्ञ डॉक्टरांसह परिचारीका, लॅब टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन, फार्मासिस्ट अशा विविध पदांची गरज असते. महापालिकेत या पदांवर काही कर्मचारी हे कायमस्वरूपी आहेत. तर, काही कर्मचारी सहा महिन्यांच्या कालावधीसाठी हंगामी स्वरूपात मानधनावर घेतले जात होते. मात्र, राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या 18 जानेवारी 2022 रोजीच्या निर्णयानुसार, पदभरतीसाठी घेण्यात येणा-या परिक्षेसाठी सध्या असलेल्या ओएमआर व्हेंडर, कंपन्यांचे पॅनेल स्थगित करण्यात आले.

 तसेच पदभरतीसाठी यापुढे होणा-या परिक्षा टीसीएस, आयबीपीएस, आणि एमकेसीएल यांच्या माध्यमातून घेण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले. त्या अनुषंगाने स्वतंत्र आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून जारी करण्यात येतील, असे शासन निर्णयात नमुद करण्यात आले होते. मात्र, अद्यापपर्यंत शासनाकडून पुढील आदेश प्राप्त झालेले नाहीत.  महापालिकेतील रिक्त पदांची सरळसेवेने ऑनलाईन पद्धतीने परिक्षा घेऊन भरती करायची असल्याने टीसीएस, आयबीपीएस, आणि एमकेसीएल या संस्थांकडून त्यांच्याकडील संपूर्ण साधनसामग्रीसह ऑनलाईन परिक्षेचे सर्व टप्पे करण्याकरिता 10 मार्च 2022 रोजीच्या पत्रानुसार, प्रपोजल मागवण्यात आले होते. त्यात टीसीएस या संस्थेचे प्रति उमेदवार 430 रूपये असे शुल्क प्राप्त झाले आहे. त्यानुसार, ऑनलाईन परिक्षेचे कामकाज टीसीएस संस्थेला देण्यात आले आहे. या कामकाजाकरिता अंदाजे 81 लाख 76  हजार रूपये आणि जीएसटी असा खर्च होणार आहे.

वैद्यकीय अधिका-याची 13 पदे असून 200 अर्ज आले आहेत. स्टाफ नर्सची 70 पदे असून 9 हजार 996,  सांख्यिकी सहायकच्या 3 पदांसाठी 439,  लॅब क्निशियनच्या 1 पदासाठी 191,  एक्स-रे टेक्निशियनच्या 3 पदासांठी 270, फार्मासिस्टच्या 7 पदासांठी तब्बल 3 हजार 897,  एएनएमच्या 31 पदासांठी 4 हजार 22 जणांचे अर्ज आले आहेत. एकूण 128 जागांसाठी 19 हजार 15 अर्ज आले आहेत.