महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांकडून राष्ट्रवादी काँग्रेसने मागविले अर्ज

0
199

पिंपरी दि. ३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरु केली असून 46 प्रभागातील इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. इच्छुकांनी सोमवार (दि.7) ते रविवारी (दि.13)पर्यंत सकाळी 10 ते सांयकाळी 4 या वेळेत खराळवाडीतील पक्ष कार्यालयात अर्ज जमा करण्याचे आवाहन शहराध्यक्ष, नगरसेवक अजित गव्हाणे यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 करिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाच्या वतीने 46 प्रभागातील इच्छुक उमेदवारांनी सोमवार (दि.7) ते रविवारी (दि.13)पर्यंत सकाळी 10 ते सांयकाळी 4 या वेळेत राष्ट्रवादी पक्ष कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथून छापील अर्ज घेवून संपूर्ण अर्ज भरून पक्ष कार्यालयात जमा करावेत. अर्जासोबत उमेदवारांनी कार्य अहवाल जोडावा लागणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ 13 मार्च 2022 रोजी संपुष्टात येत आहे. त्यापूर्वीच निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक होते. परंतु, कोरोना, ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणामुळे महापालिका निवडणूक वेळेत झाली नाही. आता ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा निकाल लागला आहे. ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने नाकारले आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेण्याचा आदेश दिला असल्याने आता महापालिकेची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते.