महानरपालिकेच्या स्वच्छता पंधरवड्यात उत्कृष्ठ काम करणाऱ्यांची नावे जाहीर

0
203

पिंपरी, दि. १८ (पीसीबी)- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान नागरी २.० अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकारच्या निर्देशानुसार १५ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत स्वच्छता पंधरवडा आयोजित करण्यात आला होता.

या अभियानाचा एक भाग “स्वच्छता ही सेवा” मोहिमेअंतर्गत “एक तारीख एक तास” उपक्रमाच्या अनुषंगाने महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधुन जयंतीच्या आदल्या दिवशी १ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता, एक तास हा स्वच्छता उपक्रम शहरात सर्वत्र राबविण्यात आला.

यामध्ये शहरातील लोकप्रतिनिधींसह आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्यासह शहरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या अभियानाच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आठ क्षेत्रीय कार्यालयातील एकुण १०० ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली होती.

आयुक्त सिंह यांच्या निर्देशानुसार “स्वच्छता ही सेवा ” मोहिमेअंतर्गत १ ऑक्टोंबर रोजी झालेल्या स्वच्छता मोहिमेची क्षेत्रीय स्तरावर स्पर्धा घेऊन कामकाजाचे मुल्यांकन करण्यात आले त्यामध्ये उत्कृष्ठ कामकाज करणा-या क्षेत्रीय कार्यालय व वॉर्ड यांची नावे जाहीर करण्यात आली.

या मोहिमेत उत्कृष्ट कामकाज करणा-या फ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी सिताराम बहुरे, सहायक आरोग्याधिकारी शांताराम माने आणि मुख्य आरोग्य निरीक्षक कांचनकुमार इंदलकर यांना आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. तर इ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे व सहायक आरोग्याधिकारी राजेश भाट यांना द्वितीय क्रमांकाचे तसेच ब क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी अमित पंडीत व सहायक आरोग्याधिकारी महादेव शिंदे यांना तृतीय क्रमांकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

या सत्काराच्या वेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, स्वच्छ भारत अभियानाचे समन्वयक तथा सहायक आयुक्त यशवंत डांगे तसेच विविध विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते