महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी विमा पॉलिसी नको, धन्वंतरीच योजनाच कायम ठेवा – राष्ट्रवादीची मागणी …

0
360

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – महापालिका कर्मचाऱ्यांच्या स्वास्थासाठी गेले पाच वर्षांपासून सुरू असलेल्या धन्वंतरी योजनेवरुन आता सत्ताधारी भाजपा विरुध्द विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस अशी जुंपली आहे. धन्वंतरी योजनाच कायम ठेवा अशी आग्रही मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचा-यांवर वैद्यकीय उपचारासाठी धन्वंतरी स्वास्थ योजना 1 सप्टेंबर 2015 पासून लागू करण्यात आली होती. ही योजना महानगरपालिकेतीली कर्मचारी, अधिकारी वर्गाच्या हित डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात राबविण्यात आली होती. परंतु, महानगरपालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या काही पदाधिकारी व नेत्यांनी कर्मचा-यांसाठी विमा योजना राबविण्याचा घाट घातला.
या योजनेला सुरुवातीपासून विरोध होत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाने या योजनेतील त्रृटी दाखवून देत विमा पॉलिसी न राबविण्याची आग्रही मागणी केली आहे. विमा पॉलिसी राबवू नये, तसेच धन्वंतरी स्वास्थ योजना चालू ठेवण्यासाठी त्यांनी बुधवारी, दिनांक 20 जानेवारी 2021 रोजी लाक्षणिक उपोषण कर्मचारी वर्गाने केले. धन्वंतरी स्वास्थ योजना तुर्तास बंद करण्यास मा. औद्योगिक न्यायालयाने स्थगिती आदेश दिलेले आहेत. तसे असताना सत्ताधारी पक्षाच्या दबावामुळे प्रशासनामार्फत विमा पॉलिसी अंमलात आणण्यासाठी सर्व खटाटोप सुरू आहे.

या विमा पॉलिसीसाठी निधी देण्याकरिता एकूण 21 कोटी रुपयांचे तरतूद वर्गीकरण महानगरपालिका सर्वसाधारण सभेत 20 जानेवारी 2021 रोजी करण्यात आले. त्यासाठी पाणीपुरवठा विशेष योजना निधीतील तरतूद वळविण्यात आली आहे. शहरातील पाणीप्रश्नाचा विचार करता पाणीपुरवठा योजनांचा निधी पळविणे, ही बाब देखील शहराच्या दृष्टीने गैर आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी मागणी करून देखील बोलू न देता सत्ताधारी पक्षाने बहुमतावर हा प्रस्ताव मंजूर केला. तरी, याबाबत तातडीने विमा पॉलिसी लागू करण्याची कार्यवाही थांबवावी आणि धन्वंतरी स्वास्थ योजना तातडीने लागू करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केली आहे,