“महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता”

0
233

नागपूर,दि.२१(पीसीबी) – आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत, असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले. अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेतर्फे मंगळवारी आयोजित अभिरूप न्यायालयात अमृता यांनी उत्तरे दिली. न्यायमूर्ती म्हणून अ‍ॅड. कुमकुम सिरपूरकर यांनी तर वकील म्हणून अजेय गंपावार आणि लिपिक म्हणून रश्मी पदवाड-मदनकर यांनी भूमिका बजावली. संस्थेच्या प्रथम अध्यक्ष ताराबाई शास्त्री यांच्या स्मृतिनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी अमृता म्हणाल्या, मी स्वत:हून कधीही राजकीय वक्तव्य करत नाही, मला त्यात रसही नाही. माझ्या वक्तव्यावर सामान्य लोक मला ट्रोल करत नाहीत. राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचे ते जल्पक असतात. त्यांना मी फारसे महत्त्व देत नाही व घाबरतही नाही. मी फक्त माझ्या आई व सासूबाईंना घाबरते. मी राजकीय वक्तव्य जास्त करीत नाही. मी जास्त बोलले तर माझे आणि देवेंद्र आम्हा दोघांचेही नुकसान होते, ही बाब मला कळून चुकली आहे. याचा फायदा अनेकांनी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून घेतला आहे. मी खूप बोलते, अशी तक्रार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे करण्यात आली होती हे खरे आहे. पण मी आहे तशी आहे. प्रतिमा तयार करण्यासाठी मी काही बदल केले नाही.

जे चोवीस तास काम करतात त्यांनी मुख्यमंत्री व्हावे!
जे २४ तास राजकारणासाठी देतात आणि राजकारणात जे लायक आहेत त्यांना मुख्यमंत्री केले पाहिजे. देवेंद्रजी २४ तास समाजासाठी झटत असतात. मी राजकारणासाठी पूर्ण वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे मला सध्या राजकारणात यायचे नसल्याचे अमृता यांनी स्पष्ट केले.