मसूद अझहर जिवंत, रावळपिंडीतून ‘जैश’च्या तळावर हलवले

0
694

नवी दिल्ली, दि. ४ (पीसीबी) – जैश-ए-मोहम्मद  दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरच्या मृत्यूवरुन प्रसारमाध्यमांमधून वेगवेगळी वृत्त समोर येत आहेत. एएनआयने पाकिस्तानी माध्यमांच्या हवाल्याने मसूद अझहर जिवंत असल्याचे म्हटले आहे.  भारताने बालकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये मसूद अझहर ठार झाला, असे काही प्रसारमाध्यमांनी म्हटले होते. तर लिव्हर कॅन्सरमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले होते.

पाकिस्तानी लष्कराने रविवारी संध्याकाळी ७.३० च्या सुमारास मसूदला रावळपिंडी येथील रुग्णालयातून बहावलपूरमधील गोथ गन्नी येथील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर हलवले आहे,  असे सांगितले जात आहे.  मसूद अझहरवर रावळपिंडी येथील लष्कराच्या रुग्णालयात मूत्रपिंडाच्या विकारावर उपचार सुरु होते.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले. त्यानंतर अझहरच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हीस ग्रुपचे १० अतिरिक्त कमांडो तैनात करण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली होती.अझहर जिवंत असून त्याची प्रकृती चांगली आहे. भारतीय हवाई दलाने बालकोटमधील आमच्या तळावर हल्ला केला. पण त्यात जीवीतहानी झाली नाही, असा दावा जैशने केला आहे.