मला माहित नाही मी खेळेन की नाही

0
249

पॅरिस, दि.०६ (पीसीबी) : चार सेटच्या प्रतिकारानंतर फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या नव्या पर्वात उप-उपांत्यपूर्व फेरीपर्यंत येऊन पोचलेला रॉजर फेडरर स्पर्धेतून माघार घेण्याचा गांभीर्याने विचार करत आहे.

फेडररने तिसऱ्या फेरीत डॉमिनिक कोएपफर याच्यावर विजय मिळविताना फेडररला संघर्ष करावा लागला होता. चार सेटपर्यंत रंगलेली लढत त्याने ७-६(७-५), ६-७(३-७), ७-६(७-४), ७-५ अशी जिंकली होती. दोन महिन्यांनी आपला ४०वा वाढदिवस साजरा करणाऱ्या फेडररने मला नाही वाटत मी खेळू शकेन असे म्हणत जणू फ्रेंच स्पर्धेतून माघार घेण्याचे संकेत दिले. फेडररची चौथ्या फेरीत इटलीच्या मॅट्टेओ बेर्रेट्टिनी याच्याशी गाठ पडणार आहे.

चौथ्या फेरीपूर्वी मला खेळायचे की नाही यावर निर्णय घ्यावा लागेल. गुडघ्यावर इतका ताण देणे योग्य आहे का आणि विश्रांती घेण्याची ही योग्य वेळ आहे का ?याचा विचार माझा मलाच करायचा आहे, असे फेडरर म्हणाला. कारकिर्दीत २० ग्रॅंड स्लॅम विजेतीपदे मिळविणाऱ्या फेडररच्या गुडघ्यावर २०२० मध्ये दोन शस्त्रक्रीया करण्यात आल्या. त्यानंतर गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेपासून तो केवळ तीन स्पर्धेत खेळला आहे. त्याला विंबल्डन खेळण्याची खूप इच्छा आहे. त्याने आतापर्यंत ही स्पर्धा आठ वेळा जिंकली आहे. त्यापूर्वी तो हॅले येथील ग्रास कोर्टवरील स्पर्धेत खेळण्याचा विचार करत आहे. ही स्पर्धा १४ जून म्हणजे फ्रेंच ओपन संपल्यावर एका दिवसाने सुरू होत आहे.

प्रत्येक सामन्यानंतर मी स्थितीचे परिक्षण करत असतो. आता उद्या सकाळी उठल्यावर मला किती त्रास होतोय यावर बरेच काही अवलंबून असेल, असेही फेडरर म्हणाला.