मराठा आरक्षणासाठी राहत्या घरासमोर त्याने स्वतःला पेटवून घेतले

0
191

जालना, दि. ३ (पीसीबी) : जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक येथील सुरज गणेश जाधव या तरुणाने सरकारने अद्याप मराठा समाजाला आरक्षण दिले नसून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी स्वत:ला पेटवून घेतले होते. गेल्या २२ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता राहत्या घरासमोर त्याने स्वतःला पेटवून घेतले होते. त्यानंतर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

सुरजने स्वत:ला पेटवून घेतल्यानंतर त्याच्या आईने त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. त्यात त्या देखील ३५ ते ४० टक्के भाजल्या गेल्या होत्या. ज्या आरक्षणासाठी सुरजने हे टोकाचं पाऊल उचललं तो आरक्षणाचा लढा नियतीने अपुराच ठेवला. परवा सकाळी उपचारादरम्यान सुरजने अखेरचा श्वास घेतला.

पेटवून घेतलेल्या सुरजला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याची आई ३५ टक्के भाजली होती. तर सुरज ६० टक्के भाजला होता. या दोघांवर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण, सुरजची उपचारांची झुंज परवा १ डिसेंबर रोजी पहाटे संपली.

सुरजच्या निधनानंतर मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण जोपर्यंत मिळत नाही आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पाथरवाला बुद्रुक गावी येत नाहीत, तोपर्यंत सुरजच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका जाधव कुटुंबीयांनी घेतली होती. अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी नातेवाईकांची समजूत घातल्याने नातेवाईक अंत्यसंस्कार करण्यासाठी तयार झाले.

त्यानंतर सुरज जाधव याच्यावर मूळ गावी पाथरवाला बुद्रुक येथे गोदावरी नदीच्या तीरावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरज अंकुशनगर येथील यशवंतराव चव्हाण औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय) मध्ये वीजतंत्री शाखेत द्वितीय वर्षात शिकत होता. त्याचा पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी टोकाचे पाऊल उचललेल्या सुरजच्या मृत्यूमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.