मनोज जरांगे यांना तत्काळ पोलिस संरक्षण द्या: सतीश काळे

0
198

जरांगे पाटील यांच्या केसालाही धक्का लागल्यास सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – मराठा आरक्षणासाठी पुण्यातील खेड येथे आज शुक्रवारी (दि. 20) आयोजित मनोज जरांगे पाटील यांच्या सभेत एका माथेफिरूने गोंधळ घालल्याची घटना घडली. जरांगे यांच्या हातातील माईक हिसकावून बोल देण्याबाबत सक्तीचा आग्रह धरला. या घटनेमुळे सभास्थळी काही काळ तणावाचे वातावरण होते. संबंधीत युवकाच्या हाती एखादे शस्त्र असते तर अनुचित प्रकार देखील घडला असता. या गोंधळाचे चित्रिकरण सर्व इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांमध्ये देखील दाखविण्यात आले. जर एखादी चुकीची घटना घडली असती तर त्याला सर्वस्वी पोलिस प्रशासन राज्य सरकार जबाबदार असते. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी मनोज जरांगे पाटील यांना पोलिस संरक्षण द्या, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे सतिश काळे यांनी गृह विभागाला प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. तसेच संबंधीत युवकाची कसून चौकशी करण्याची मागणी काळे यांनी केली आहे.

काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, शुक्रवारी (दि. 20) खेड येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील सभेला पुन्हा मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव एकजुटीने उपस्थित होता. या दरम्यान जरांगे पाटील यांनी शासनाला आवाहन करत भाषण केले. शांततेच्या मार्गाने आरक्षणाचा लढा लढण्याचे आवाहन त्यांनी केले. मराठा समाज बांधवांनी आतापर्यंत शांततेच्याच मार्गान आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. जरांगे यांनी इतर समाजाविषयी चुकीची वक्तव्ये केली नाहीत. तरीही त्यांच्या सभेत काही वेळ गोंधळ निर्माण करण्यात आला.

पुण्यातील खेड येथे आयोजित सभेत मनोज जरांगे पाटील यांचे भाषण पुर्ण झाले. त्यानंतर आरक्षणाच्या लढ्यासाठी बलिदान दिलेल्या लढवय्यांना आदरांजली वाहण्यात येणार होती. त्यानंतर राष्ट्रगीत होऊन कार्यक्रमाची सांगता होणार असा नियोजित कार्यक्रम होता. मात्र तो पर्यंत एका माथेफिरू युवकाने सर्व कार्यक्रम झाल्यानंतर मला बोलू द्यावे, अन्यथा मी आत्महत्या करीन असा आग्रह धरत गोंधळ घातला. अन्यथा मी आत्महत्या करेन असा इशारा दिला. मनोज जरांग पाटील यांच्या हातातील माईक जबरदस्तीने हिसकावून घेतला. या युवकाकडे एखादे शस्त्र असते तर अनुचित प्रकार घडला असता. पोलिस प्रशासनाच्या अपयशाने हा गोंधळ झाला आहे. जरांगे यांच्या पाठीमागे मराठा समाज मोठ्या संख्येने उभा राहत आहे. त्यामुळे काही समाजकंटकांकडून देखील त्यांना त्रास दिला जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या विषयी गैरसमज पसरविला जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मराठा समाजाचा एक लढवय्या साथी सुरक्षित राहणे गरजेचे आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांना पोलिस विभागाकडून संरक्षण मिळावे, असे आवाहन सतिश काळे यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे गृह विभागाला केले आहे.

तसेच संबंधीत गोंधळ घालणार्‍या युवकाची कसून चौकशी करावी, अशी देखील मागणी केली आहे. भविष्यात जरांगे पाटील यांच्या केसालाही धक्का लागल्यास त्याचे राज्य सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील,असा इशारा काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला.