मतदार वाढले! प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यासाठी महापालिकेने मागितली आठ दिवसांची मुदत

0
388

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – पिंपरी, चिंचवड आणि भोसरी अशा तीनही विधानसभा मतदारसंघात 31 मे पर्यंत सुमारे 40 हजार मतदारांची वाढ झाली आहे. त्यामुळे 17 जूनपर्यंत प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे काम पूर्ण होणार नाही. त्यामुळे महापालिका निवडणूक विभागाने प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यास राज्य निवडणूक आयोगाकडे आठ दिवसांची लेखी पत्राद्वारे मुदत मागितली आहे.

ओबीसी आरक्षणाच्या प्रलंबित प्रश्‍नामुळे राज्यातील महापालिका निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत. मात्र, ज्या ठिकाणी पाऊस कमी तेथे त्वरीत निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणुक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे आयोगाच्या सुचनेनुसार महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत प्रभाग रचना, आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. निवडणुक याद्यांचाही कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार 17 जून रोजी प्रभागानुसार प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द करण्याच्या सुचना दिल्या होत्या. 17 ते 25 जूनपर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत होती. 7 जुलैला अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिध्द कराव्यात, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते.

सुरूवातीला 5 जानेवारी 2022 अखेरपर्यंतच्या मतदार ग्राह्य धरण्यात येणार होत्या. आयोगाने आगामी महापालिका निवडणुकीसाठी 31 मे 2022 पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरावी, अशा नव्याने सुचना केल्या आहेत. दरम्यान, शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदार संघात मतदारांची संख्या वाढली आहे. सुमारे 40 हजार मतदार तिन्ही विधानसभा मतदार संघात वाढले आहेत. तसेच निवडणूक शाखेला मतदार याद्या मिळण्यास देखील विलंब झाला. परिणामी, 17 जूनपर्यंत प्रारुप याद्या प्रसिद्ध करणे अशक्य आहे. याद्या तयार करण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. त्यासाठी निवडणूक शाखेने आठ दिवसांची मुदत मागितली आहे असे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सांगितले.