“मग आता मुख्यमंत्री नवाब मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणार का?”: भाजपचा थेट सवाल

0
212

मुंबई, दि.०९ (पीसीबी) : मागील काही दिवसांपासून नवाब मलिक चांगलेच चर्चेत आहेत. त्यात आता भर म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्यावर काही आरोप केलेत. दरम्यान, मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरण व आर्यन खानच्या अटकेनंतर राज्यात सुरू झालेला राजकीय धुळवड अद्यापही सुरूच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी आणि विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासह विरोधी पक्ष भाजपावर देखील टीका सुरू केलेली आहे. यावर आता भाजपाकडून देखील आक्रमक भूमिका घेत प्रत्युत्तर दिले जात आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांचे थेट अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी कागदोपत्री पुरावे देखील सादर केले असून ते संबंधित तपास यंत्रणांकडे देखील देणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर, फडणवीसांच्या या खळबळजनक आरोपाच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला गेला आहे.

“विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत असलेले संबंध उघड केले. मलिक यांनी देशाच्या गुन्हेगारांसोबत केलेले व्यवहार पुराव्यानिशी समोर आले आहेत. आता मुख्यमंत्री व त्यांच्या पक्षाचे प्रमुख मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणार का?” असा सवाल भाजपाकडून करण्यात आला आहे. तर, नवाब मलिक यांचा सहभाग असलेल्या किमान ५ व्यवहारांमध्ये अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. २००५ पासून दोन वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजेच नवाब मलिक राज्यात अल्पसंख्याक मंत्री होईपर्यंत झालेल्या व्यवहारांचा यामध्ये समावेश असल्याचं फडणवीस म्हणाले. आज दुपारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.