मंत्रीपद मिळण्याची पिंपरी-चिंचवडकरांना आशा; राज्य मंत्रीमंडळ विस्ताराकडे शहराचे लक्ष

0
843

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी विधानसभेच्या अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कायम हुलकावणी मिळणाऱ्या पिंपरी-चिंचवडला शेवटच्या क्षणी तरी मंत्रिमंडळात स्थान मिळेल का? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलवण्याची किमया केलेले भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांना मंत्रीपद मिळाल्यास पिंपरी-चिंचवडमध्ये पक्ष आणखी मजबूत होऊन त्याचा विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा होणार आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट हे खासदार झाल्याने अन्न व नागरी पुरवठा खाते बिनमंत्र्याचे झाले आहे. त्यामुळे आमदार जगताप यांना मंत्री होण्याची संधी मिळेल, अशी शहरवासीयांना आशा आहे.  

पिंपरी-चिंचवड हा अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जात होता. पिंपरी-चिंचवड महापालिका म्हणजे अजितदादांचा मजबूत गड होता. परंतु, २०१४ च्या निवडणुकीत आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड मतदारसंघाच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथमच कमळ फुलवले. त्यानंतर २०१७ च्या महापालिका निवडणुकीत आमदार जगताप यांनी अजितदादांचा गड असलेल्या महापालिकेत सुद्धा कमळ फुलवण्याची राजकीय किमया करून दाखवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार जगताप यांच्यावर दाखवलेल्या विश्वास सार्थ ठरला. पिंपरी-चिंचवडकरांनी देखील भाजपला भरभरून साथ दिली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळात पिंपरी-चिंचवड शहराला योग्य प्रतिनिधीत्व देण्याचे वचन महापालिका निवडणुकीवेळी शहराला दिले.

गेल्या दोन-अडीच वर्षात राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनेकदा बातम्या आल्या. परंतु, विस्तार काही होऊ शकला नाही आणि मंत्रिमंडळात पिंपरी-चिंचवड शहाराला स्थान मिळू शकले नाही. परंतु, आता आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही एका वृत्तवाहिनीशी बोलताना विधानसभेच्या अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे सांगितले आहे. दानवे यांनी जून महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे म्हटले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांच्या मंत्रिपदाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

त्यातच पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट हे खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा खाते बिनमंत्र्याचे होणार आहे. तसेच पालकमंत्रीपद सुद्धा रिकामे राहाणार आहे. अशा परिस्थितीत पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी शहरवासीयांना आशा आहे. जगताप हे एकदा विधान परिषदेवर आणि दोनदा विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांना विधानसभेच्या कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. तसेच राजकीय संघटन कौशल्यात ते शहरातील इतर राजकारण्यांपेक्षा निश्चितच सरस आहेत.

त्याचप्रमाणे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आमदार जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवाराला सुमारे एक लाखांचे मताधिक्य मिळवून दिले आहे. तसा शब्दच त्यांनी निवडणुकीआधी दिला होता. तो त्यांनी खरा करून दाखवला आहे. शहराच्या राजकारणात किंगमेकर म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या शेवटच्या विस्तारात आमदार जगताप यांना मंत्रीपद मिळाल्यास अजितदादांचा बालेकिल्ला काबिज केल्याची पक्षश्रेष्ठींनी शेवटी का होईना दखल घेतल्याचे मानले जाईल. तसेच या मंत्रीपदाचा पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला त्याचा मोठा फायदा होऊन आगामी विधानसभा निवडणुकीत शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघात युतीचा विजय होणे आणखी सोपे होईल. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराकडे पिंपरी-चिंचवडकरांचे लक्ष लागले आहे.