भ्रष्टाचाऱ्यांकडून पैसा वसूल करणार – अमित शाह

0
223

राजनांदगाव, दि. १७ (पीसीबी) : आगामी निवडणुकीनंतर छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल सरकार पुन्हा आले तर काँग्रेस पुन्हा राज्यात लांगुलचालन आणि मतपेढीचे राजकारण करेल, असे गृहमंत्री अमित शाह यांनी भाकीत केले.राजनांदगाव शहरात आयोजित सभेत बोलताना शहा म्हणाले, काँग्रेसच्या सरकारने एखाद्या हॉटेलच्या साखळीप्रमाणे दिल्लीपर्यंत एक भ्रष्टाचाराची साखळी तयार केली आहे. मात्र छत्तीसगडमध्ये भाजपचे सरकार आले तर भ्रष्टाचाऱ्यांकडून पैसे वसूल केले जातील आणि त्यांना उलटे टांगले जाईल, असाही इशारा दिला. छत्तीसगड येथे दोन टप्प्यांत ९० जागांसाठी ७ आणि १७ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे.

गृहमंत्री अमित शहा म्हणाले, या राज्याची निर्मिती तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी केल्याची आठवण छत्तीसगडवासीयांना करून देण्यासाठी आपण आलो आहोत. काँग्रेसच्या काळात पूर्वीचे मध्य प्रदेश आणि छत्तीसगड हे बिमारू राज्यांच्या श्रेणीत यायचे. मात्र डॉ. रमणसिंह नेतृत्वाखाली आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर पंधरा वर्षात बिमारू राज्य विकसित करण्याचे काम केले.छत्तीसगडची जनता काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला वैतागली आहे आणि तिने आता भाजपला सत्ता मिळवून देण्याचा निर्धार केला आहे. शहा यांनी बेमेतरा जिल्ह्यातील बिरानपूर गावात झालेल्या धार्मिक दंगलीवरून भूपेश बघेल सरकारला धारेवर धरले.
छत्तीसगड पुन्हा धार्मिक दंगलीचे केंद्र व्हावे का? असा सवाल त्यांनी केला. बिरनपूर दंगलीत भुवनेश्‍वर साहू यांची हत्या झाली होती. त्यामुळे भुवनेश्‍वर साहू यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्याचे भाजपने ठरविले असून त्यांचे वडील श्री ईश्‍वर साहू यांना उमेदवारी दिली असल्याचे शहा यांनी सांगितले.भूपेश बघेल सरकारने छत्तीसगडला काँग्रेसच्या दरबारातील ‘एटीएम’ केले आहे. छत्तीसगडच्या आदिवासी तरुणांच्या हक्काचा पैसा, मागासवर्गीयांतील तरुण भावंडांचा हक्कांचा पैसा दिल्ली दरबारच्या तिजोरीत जात असल्याचा दावा शहा यांनी केलाआगामी निवडणूक ही एखादे सरकार किंवा आमदारांना निवडण्यासाठी नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सोनेरी भवितव्य साकारण्यासाठी आहे, असेही ते म्हणाले.