‘भ्रष्टाचार, लाचखोरीच्या स्पर्धेतही भाजपचे नेते अव्वलस्थानी येतील !’

0
461

माजी महापौर योगेश बहल यांचे एकनाथ पवार यांना सडेतोड उत्तर

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये गेल्या पाच वर्षांत सत्तेच्या जोरावर लाचखोरी आणि भ्रष्टाचार करणाऱ्या भाजपकडून महापौर परिषदेच्या पुरस्कारावरून उर बडवून घेण्यास सुरुवात झाली आहे. भाजपच्या सत्ताकाळात पिंपरी-चिंचवड शहराचा सन्मान ज्यांनी धुळीस मिळविला ते आता विकासकामांच्या गप्पा मारत आहेत ही मोठी शोकांतिका असून भ्रष्टाचार, लाचखोरी आणि खंडणीखोरांची एखादी स्पर्धा घेतल्यास या महाशयांचा नक्कीचा पहिला नंबर येईल, अशा शब्दात राष्ट्रवादीचे माजी महापौर तथा मुख्य प्रवक्ते योगेश बहल यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेस उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र महापौर परिषदेतर्फे ‘ब’ वर्ग महानगरपालिकांच्या गटात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार घोषित झाल्यानंतर भाजपाचे माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पत्रक काढून भाजपाने केलेल्या कामगिरीचे कौतुक करतानाच राष्ट्रवादीवर टीका केली होती. त्याला आता योगेश बहल यांनी पत्रकाद्वारे प्रत्युत्तर देत भाजपवर सडकून टीका केली आहे.

याबाबत बहल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र महापौर परिषदेच्यावतीने पिंपरी-चिंचवड महापालिकेला ‘ब’ वर्गात उत्कृष्ट काम केल्याबद्दलचा पुरस्कार दिला आहे. ठाणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिक या तीन महापालिका ‘ब’ वर्गात येतात. त्यामध्ये पहिला पुरस्कार मिळविल्याचा दावा एकनाथ पवार करीत आहेत. सन 2018-19 या वर्षांतील कामांसाठी हा पुरस्कार मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे. वास्तविक, या वर्षांत केलेल्या ज्या योजनांबद्दल हा पुरस्कार मिळाला त्या योजना राष्ट्रवादीच्या काळात सुरू झालेल्या आहेत.

मल:निस्सारण, घनकचरा व्यवस्थापन, महिला व बालकल्याण योजना, स्वच्छता, आरोग्य, वैद्यकीय सुविधांबाबत हा पुरस्कार देण्यात आला आहे. यातील कोणती योजना एकनाथ पवारांच्या पक्षाने आपल्या सत्ताकाळात सुरू केली ते एकदा जाहीर करावे, असे आव्हानही बहल यांनी दिले आहे. इतरांच्या कामांचे श्रेय लाटण्याची परंपरा कायम राखणाऱ्या भाजपने आपल्या सत्ताकाळात कोणत्या योजना आणल्या त्या जनतेसमोर मांडाव्यात असेही बहल यांनी म्हटले आहे.

वस्तुत: राष्ट्रवादीच्या काळात पिंपरी-चिंचवड शहराने देशपातळीवरच नव्हे तर आशिया खंडात आपला नावलौकीक मिळविला होता. हा नावलौकिक गेल्या पाच वर्षांत या भाजप मंडळींनी धुळीस मिळविला. या पक्षाचा स्थायी समितीचा अध्यक्ष लाच घेताना रंगेहाथ पकडला गेला, उपमहापौर खंडणी घेतल्यामुळे जेलमध्ये गेला, यांच्या पक्षाच्या आमदारांशी संबंधित ‘गुरुजी’ या संस्थेतीत झालेल्या गैरकृत्यामुळे अनेकांना जेलवारी करावी लागली, आमदारांच्या बगलबच्च्यांनी महापालिकेला बोगस एफडीआर दिल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याने शहराची मान शरमेने खाली गेली. भाजप नगरसेवकाच्या संबंधित श्रीकृपा या ठेकेदाराने निविदेसोबत बोगस कागदपत्रे देऊन महापालिकेची फसवणूक केली. शहराचा नावलौकीक धुळीस मिळविणारे आता पहिला क्रमांक आल्याचे सांगून श्रेय लाटतात यावरूनच ही मंडळी किती निर्ढावलेली आहेत हे देखील स्पष्ट होते.

गेल्या पाच वर्षांत केवळ भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार करून स्वत:च्या तुंबड्या भरण्याचे उद्योग करणाऱ्या भाजपची सत्ता महापालिकेतून जाणार हे स्पष्ट असल्याने त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्याने इतरांच्या कामाचे श्रेय लाटण्याचा लाजिरवाणा प्रयत्न एकनाथ पवार यांच्याकडून सुरू आहे. शहराची अपकिर्ती करणाऱ्यांना जनता तर धडा शिकवेलच परंतू सर्वांत प्रामाणिक प्राणी असलेल्या कुत्र्यासारख्या प्राण्याच्या नसबंदीमध्येदेखील पैसे खाणाऱ्यांना आता कोणीच वाचवू शकणार नाही याची खात्री आहे. सर्वसामान्य कुटूंबातील तरुणांसाठी व्यायामशाळा महापालिकेने उभारल्या, मात्र त्यामध्ये सुद्धा पैसे कमाविण्यासाठी त्याचे खासगीकरून करून व्यवसाय करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना त्याचे उत्तर जनतेला द्यावे लागणार आहे.

करोना काळात या भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी गोरगरिब करोना बाधितांची रेमडेसीवीरसारखी इंजेक्शन विकून स्वत:ची घरे भरल्याचे प्रकार आणि रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी पैसे घेणाऱ्या ‘स्पर्श’ हॉस्पीटलमधील भाजप नगरसेवकांची भागीदारी उजेडात त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकांनी आणून यापूर्वीच ‘घरचा पुरस्कार’ दिला आहे. संतपिठासारखा जिव्हाळ्याच्या विषयात देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करावा यासारखे शहरवासीयांचे दुसरे दुर्दैव नाही. शहरवासीयांसाठी अत्यंत लाजिरवाणे आणि वेदना देणारे उद्योग भाजपने गेल्या पाच वर्षांत आपल्या सत्तेच्या जोरावर केलेले असताना आता पुरस्काराचे श्रेय लाटण्याचा प्रकार हा हास्यास्पद आहे. अशा पुरस्कारामुळे भाजपनेत्यांनी पुन्हा सत्तेत येण्याची स्वप्ने पाहणे आता सोडून द्यावे, असा टोलाही बहल यांनी लगावला आहे.