भोसरीत शाळेतील क्लार्क महिलेने केला नऊ लाखांचा अपहार; गुन्हा दाखल

0
666

भोसरी, दि. २३ (पीसीबी) – विद्यार्थ्यांकडून फीचे पैसे स्विकारुन त्याची शाळेच्या रेकॉर्डमध्ये नोंद केली. त्यानंतर शाळेच्या संगणकामधून सर्व पावत्या डिलीट करून तब्बल ८ लाख ९१ हजार ७९७ रुपयांचा अपहार केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार सन २०१५ ते १४ जून २०१९ या कालावधीत दिघी रोड भोसरी येथे प्रियदर्शनी हायस्कूलमध्ये घडला.

याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक अमित बापूसाहेब पाटील (वय ४०, रा. पिंपरी गाव) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार क्लार्क राजश्री देशमुख (रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी रोड भोसरी येथे प्रियदर्शनी हायस्कूल आहे. या शाळेत अमित पाटील मुख्याध्यापक असून आरोपी राजश्री क्लार्क म्हणून काम करतात. सन २०१५ ते १४ जून २०१९ या कालावधीत पालकांकडून विद्यार्थ्यांच्या फीचे पैसे राजश्री यांनी स्वीकारले. त्याची शाळेच्या संगणकात नोंद केली. पण शाळेच्या नोंद खतावणी रजिस्टरमध्ये नोंद न करता सुमारे १ हजार ३५५ पावत्या त्यांनी संगणकातून डिलीट केल्या. त्यामुळे त्या पावत्यांचे कोणतेही रेकॉर्ड शाळेकडे राहिले नाही. याचा गैरफायदा घेत त्यांनी एकूण ८ लाख ९१ हजार ७९७ रुपयांचा अपहार करून शाळेची फसवणूक केली. मुख्याध्यापक अमित पाटील यांना मागील काही दिवसांपूर्वी याबाबत संशय आला. त्यांनी खतावणी रजिस्टर, संगणकातील रेकॉर्ड यांचा तपशील तपासला असता हा प्रकार समोर आला. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.